पुणे मेट्रो स्टेशनसाठी फळबाजार हलवणार

मेट्रोने दिला महापालिकेला प्रस्ताव : नवीन इमारतीमध्ये पुनर्वसन

पुणे – महात्मा फुले मंडईतील फळ बाजार मेट्रो स्टेशनसाठी हलविण्यात येणार असून या विक्रेत्यांचे तेथीलच नवीन इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही महामेट्रोने महापालिकेला दिला आहे.

महात्मा फुले मंडई येथील फळबाजार, झुणका भाकर केंद्र, तसेच या परिसरातील काही इमारती मेट्रो स्टेशनच्या कामासाठी “महामेट्रो’ भूसंपादन करणार आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांचे याचठिकाणी नवी मंडईच्या वर बहुमजली इमारत बांधून पुनर्वसन करण्यात येणार आहे.

शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रोचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. मंडईच्या ठिकाणी भूमिगत मेट्रो स्टेशन होणार आहे. त्यामुळे याठिकाणी स्टेशनला जाण्यासाठी पादचारी मार्ग करण्यात येणार आहे; तसेच अन्य कारणासाठी मेट्रोला ही जागा आवश्‍यक आहे.

शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी आणि महामेट्रोचे अधिकारी या जागेची संयुक्‍तिक पाहणी करणार आहेत. याठिकाणी सध्या जुनी महात्मा फुले मंडई आहे. मंडईला कोणताही धोका नाही. मात्र, त्याच्या मागे असणाऱ्या फळ बाजाराची जागा मेट्रोला हवी आहे. त्याचबरोबर याठिकाणी दोन इमारती आणि झुणका भाकर केंद्राची जागा मेट्रोला स्टेशनसाठी हवी आहे.

याठिकाणी रस्त्यावर बसणाऱ्या अनधिकृत पथारी व्यावसायिकांचे मात्र पुनर्वसन होणार नाही, परंतु अधिकृत फेरीवाल्यांचे होणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी एक मजला बांधण्यात येणार
मेट्रोचे याठिकाणी स्टेशन होणार असल्यामुळे स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी जागा लागणार आहे. आर्यन या वाहनतळाजवळ मेट्रो स्टेशनपासून बाहेर पडता येईल. त्याचबरोबर आणखी एका ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहनतळाची देखील व्यवस्था करावी लागणार असल्यामुळे मेट्रोला ही जागा देणे आवश्‍यक आहे. पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी नव्या मंडईवर आणखी एक मजला बांधण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.