जगायचं, की मरायचं? लॉकडाऊनच्या भीतीने व्यापाऱ्यांना चिंता

करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात


अर्थकारणावर परिणाम झाल्यास संपूर्ण शहराला बसेल फटका

पुणे – “पहिल्याच लॉकडाऊनमुळे आमचं अक्षरश: कंबरडं मोडलंय… जीवनावश्‍यक वस्तू वगळता अन्य व्यापाराची घडी अजूनही बसली नाही…त्यात पुन्हा करोना बाधित वाढताहेत…लॉकडाउनचे संकेत मिळत आहेत…आम्ही जगायचं की मरायचं, अशी चिंता आता सतावतेय…’ अशीच भावना व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. आता लॉकडाऊन व्यापाऱ्यांनाच काय, इतर कुणालाही परवडणारा नाही. व्यापारी अधिक कर्जबाजारी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनपेक्षा सरकारने करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी गर्दी नियंत्रण, जनजागृती करणे आवश्‍यक आहे, अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दैनिक “प्रभात’कडे व्यक्त केल्या.

…तर उधारी मिळणे कठीण
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले म्हणाले, “करोनाच्या पूर्वीची घाऊक व्यापाऱ्यांची उधारी अडकली आहे. ती अद्याप मिळालेली नाही. येथे आलेला शेतकऱ्यांच्या माल खपण्यासाठी आडत्यांना उधार मालाची विक्री करावीच लागते. आता जर पुन्हा लॉकडाऊन झाले, तर पुन्हा व्यापाऱ्यांची उधारी अडकण्यची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारातील व्यापारी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. आडते कर्जबाजारी होतील. मुळातच करोनामुळे भाजीपाला व्यापार काही प्रमाणात मार्केटच्या बाहेर गेला आहे. तो पूर्णपणे बाहेर जाण्याची शक्‍यता आहे. अर्थकारणावर परिणाम झाल्यास त्याचा फटका व्यापारातील इतर घटकांना असणार आहे.’

दिवाळखोरी जाहीर करावी लागेल
“लॉकडाऊननंतर व्यापाऱ्यांना उभे करण्यासाठी मोठी कसोटी करावी लागली. अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांनी कर्जावर कर्ज काढले आहे. पूर्वीचे आणि आताच्या कर्जाचे मिळून हप्ते भरावे लागत आहेत. मागील वर्षी नुकसान झाल्यानंतरही आंबा अथवा इतर फळांसाठी उचलही दिली आहे. दोन महिन्यापासून आता व्यापार काही प्रमाणात सुरळीत होत आहे. परिस्थिती सुधारल्याशिवाय उधारी देऊ शकत नाही, असे किरकोळ व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आता लॉकडाऊन झाले, पूर्वीचे आणि आता उचल अथवा उधारी स्वरूपात दिलेले पैसे बुडतील. व्यापाऱ्यांना दिवाळखोरी जाहीर करावी लागेल,’असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी सांगितले.

लॉकडाऊन हा उपाय नाही
फामचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी आवाहन केले, की “व्यापाऱ्यांना वेठीस धरून नका. काहीही झाले की व्यापार बंदचा निर्णय घेतला जातो. पुन्हा लॉकडाउनला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. व्यापारामुळे करोना वाढत नाही. ज्यामुळे करोना वाढतो, त्याची कारणे शोधा. त्यावर नियंत्रण आणा. दुकानात गर्दी होत असल्याचे सोशल मीडियावर आणि इतरत्र दाखवले जाते. मात्र, प्रत्यक्ष दुकानात किती गर्दी आहे? बाकीच्या ठिकाणी किती गर्दी आहे? याचा विचार केला पाहिजे. शासनाने असलेल्या यंत्रणाचा वापर करून करोनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लॉकडाऊन हा यावरील उपाय नाही. लॉकडाऊन करून रुग्णांची संख्या कमी होत नाही, हे पाठीमागील अनुभवावरून सरकारने शिकायला हवे.’

…तर बेरोजगारी वाढेल
दी पूना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, “लॉकडाऊन झाल्यास व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा काळात माल दुकानात पडून राहण्याची शक्‍यता असते. नाशवंत वस्तुंचे नुकसान होण्याची शक्‍यता अधिक असते. व्यापाऱ्यांना जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते, कामगारांचा पगार द्यावा लागतो. व्यवसाय न झाल्यास कामगारांना पगार देणार कोठून? परिणामी, व्यापारी वर्ग कामावरून कामगार कमी करण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन व्यापाऱ्यांनाच काय, तर कोणालाही परवडणारा नाही. त्या ऐवजी मॉल, सिनेमागृह, लग्न आणि इतर सोहळे, हॉटेल्स यामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असे केले, तरच करोनामुळे निर्माण होणारी संभाव्य स्थिती आपल्याला आताच नियंत्रणात आणता येईल. प्रशासनाने यावर आताच निर्णय घ्यावा.’

पैसा बाजारात फिरला पाहिजे
पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया म्हणाले, “मुळातच करोनाचा व्यापारावर दूरगामी परिणाम झाला आहे. जीवनावश्‍यक वस्तू वगळता अन्य वस्तुंना अजूनही अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे. यामध्येही प्रामुख्याने विचार केल्यास कपडे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, धातुंच्या वस्तू, सोने-चांदीच्या आणि दागिने खरेदी-विक्रीवर लॉकडाउनचा खूप मोठा आणि विपरीत परिणाम झालेला आहे. अनलॉक होऊन अजूनही व्यापार सुरळीत झालेला नाही. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन झाल्यास पुढील दोन वर्षे व्यापारावर मोठा नकारात्मक परिणाम होईल. तर काही व्यवसाय बंद पडण्याची शक्‍यता आहे. कित्येकांना दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पैसा बाजारात फिरल्याशिवाय व्यापार सुरळीत होणार नाही.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.