याबाबत जलमंदिर पॅलेस येथून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, सुमारे 1853 च्या सुमारास श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज (थोरले) यांनी मूळचे कास धरण साकारण्याचे सर्वप्रथम प्रयत्न केले, तसेच स्व. दादामहाराज सातारा नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष असताना मूळ धरणाची उंची वाढवण्याची आणि कास बंदिस्त पाइपलाइनची संकल्पना त्यांनी मांडली होती.
उदयनराजे म्हणाले, “”कास बंदिस्त पाइपलाइनची संकल्पना आम्ही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि पुढे महसूल राज्यमंत्री असताना साकारली. कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामास देखील सुमारे दोन वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली. या कामापैकी 80 टक्कयापेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील पावसाळ्यानंतरच्या कामाचा आज शुभारंभ होत आहे.
लवकरच म्हणजे येत्या दोन- तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. पूर्ण उताराने सुमारे 27 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून कासचे पाणी सातारकरांची तहान अहोरात्र भागवत आहे. आता कास धरण क्षमतेत भक्कम वाढ होत असल्याने सातारकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही याचे समाधान आहे.” पर्यटनाच्या दृष्टीने स्थानिकांना लाभ मिळेल अशा दृष्टीकोनामधून या ठिकाणी बोटिंग, तसेच व्हिव्हिंग गॅलरी उभारण्यात येणार आहे.
जेणेकरुन शात्रीय दृष्टीकोनामधून पर्यटकांना येथील निसर्गसंपन्नतेचा अनुभव घेता येईल आणि स्थानिकांनाही भक्कम रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे प्रयत्न आमचे सुरु असून लवकरच त्या कामांचा देखील शुभारंभ होईल, असे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबरीने स्थानिक ग्रामस्थांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. कास धरण उंची वाढवताना ग्रामस्थांच्या सुविधेचे जे प्रश्न आहेत ते निश्चितपणे प्राधान्याने सोडवण्यात आले आहेत. राहिलेले प्रश्न देखील प्राधान्याने सोडवले जातील, असेही खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे.