नागपूर – करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमासोबतच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर कठोर नियंत्रण करण्यात यावे. त्यासोबतच करोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये 60 वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात यावी तसेच ज्येष्ठ नागरिकांचे सुलभपणे लसीकरण करता येईल या दृष्टीने नियोजन करा, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात करोना विषाणुचा प्रादुर्भाव व लसीकरण मोहिमेचा आढावा डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. संजीव कुमार म्हणाले की, जिल्ह्यात सहा लाख नागरिकांचे लसीकरण करणे अपेक्षित आहे त्यादृष्टीने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करुन दररोज 10 ते 15 हजार नागरिकांचे लसीकरण करता येईल यादृष्टीने नियोजन करावे. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक केंद्रावर मार्गदर्शन व सुविधा केंद्रही सुरू करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
नागपूर शहर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स यासह 11 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात शासकीय ग्रामीण रुग्णालय व सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय व सुविधा केंद्रावर जनतेचा विश्वास असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी होत असल्यामुळे या सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
खासगी रुग्णालयात आजपासून लसीकरण
शासकीय केंद्रासोबतच शहरातील 16 रुग्णालयात लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. या मोहिमेसाठी रुग्णालयांनी परवानगी दिली असून या केंद्रावर उद्यापासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. शासनाच्या विविध आरोग्य विषयक उपचारासाठी 40 रुग्णालयांची नोंदणी झालेली आहे. या सर्व रुग्णालयांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्यानंतर इतर हॉस्पिटलमध्येही सुविधा सुरू होईल. खासगी रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.