आणीबाणी काळातील “त्या’ बंदीजनांना सन्मानपत्र देणार – मुख्यमंत्री

मुंबई – आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा कमी कालावधी तुरुंगवास भोगलेल्यांना 5 हजार तर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंदीजनांना 10 हजार मानधन देण्यात येत असून भविष्यात त्यांचे मानधन वाढविण्याचा विचार केला जाईल. मात्र, आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

सन 1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरावे, याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य अजित पवार यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री पराग अळवणी, सुभाष पाटील, शशिकांत शिंदे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. फडणवीस म्हणाले, आतापर्यंत 3267 जणांना मानधन मंजूर करण्यात आले आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात राहणाऱ्यांना आणीबाणीच्या काळात बंदीवास भोगावा लागला आहे. ते आज विविध ठिकाणी आहेत त्यांची शपथपत्रे घेण्यात येतात मात्र, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय ते मंजूर करण्यात येत नसल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली.

संबंधित कामकाज कालमर्यादेत पूर्ण व्हावे यासाठी जिल्हाधिका-यांना निर्देश देण्यात येतील. भविष्यात हा निधी वाढविण्यासाठी विचार करण्यात येईल. त्याचबरोबर गोवा मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम संबंधित सर्व सैनिकांना मानधन प्रदान करण्यात येते. या सैनिकांना आणि आणीबाणीत बंदीवास भोगलेल्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.