पुणे(प्रतिनिधी) – पोलीस आयुक्त पदाची सूत्रे अमिताभ गुप्ता यांनी हाती घेताच शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढले. मागील दहा दिवसांत तब्बल सहा जणांची निर्घुन हत्या करण्यात आली. यामुळे कायदा-सुव्यस्थेची परिस्थिती गंभीर बनल्याने शहरात खळबळ माजली होती. खासदार गिरीश बापट यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अँटी गुंडा स्कॉड स्थापन करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारीची गंभीर दखल घेतली आहे. कोणत्याही गुंड प्रवृत्तीला शहरातील शांतता भंग करुन देणार नाही असे सांगत येत्या तीन महिण्यात शहरातील गुन्हेगारी संपवू असे आश्वासन त्यांनी पुणेकरांना दिले आहे.
शहरात अनलॉक नंतर गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. खून, खूनाचा प्रयत्न, मारहाण, जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्हयांनी डोके वर काढले आहे. लॉकडाऊनमुळे आलेले आर्थिक संकट तसेच पुर्व वैमनस्य यातून हे प्रकार घडत आहेत. मागील दोन आठवड्यात तर कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच बांधकाम व्यवसायीकाचा सोमवारी खून झाला. यामुळे पोलीस आयुक्तांवरील कायदा-सुव्यस्था अबाधित राखण्याचे दडपण वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर मागील दहा दिवसांत घडलेल्या सहा खूनाच्या गुन्हयांच्या तपासासंदर्भात पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील गुन्हेगारी बद्दल भाष्य केले. या पत्रकार परिषदेस सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त नामेदव चव्हाण उपस्थित होते.
गुप्ता म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात 260 गुन्हेगार जामिनावर व पॅरोलवर सुटले. नेमके याच काळात गुन्हेगारी वाढल्याचे दिसले. पण जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांमुळे गुन्हेगारी वाढली असे आपण ठोसपणे सांगू शकत नाही. गुन्हे घडणार नाहीत याची आपण पुरेशी काळजी घेत आहोत. मात्र कोणत्याही घटनांना आपण प्रतिबंध करु शकत नाही. घटना घडली तर मात्र आपण तात्काळ कारवाई करत गुन्हेगारांना अटक करत आहोत.
शहरातील गुन्हेगारी संपवण्याच्या दुष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. येत्या तीन महिन्यात तुम्हाला पुर्णपणे वेगळे चित्र दिसणार आहे. गुन्हेगारांची यादी तयार आहे. त्यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे. गुन्हेगारांना पुर्वीपेक्षाही जादा जरब बसल अशी कारवाई केली जाईल. सहा खूनाच्या गुन्हयांपैकी पाच खूनाचे गुन्हे पोलिसांनी 24 तासात उघडकीस आणले आहेत.