आंतरराष्ट्रीय धर्तीवर व्याघ्र प्रकल्पांचा विकास करणार – जयकुमार रावल

मुंबई – दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सहाही व्याघ्रप्रकल्पांचा विकास करण्यासाठी आणि राज्यातले व्याघ्र वैभव देश विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील शिष्टमंडळाने नुकतीच रावल यांची भेट घेतली. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या कौन्सिल जनरल मरोपिनी रोमोकगोपा, पर्यटन विभाग प्रमुख नेलस्वा नकानी, लॅरोटा मशाईल उपस्थित होत्या. आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प विकसित करणाऱ्या तज्ज्ञ आणि उपाययोजनांच्या माहितीची आदानप्रदान करण्या संदर्भात उभयतांत सकारात्मक चर्चा झाली.

महाराष्ट्राला मिळालेली व्याघ्रसंपत्ती पर्यटन वृद्धीसाठी उपयुक्त ठरू शकते. देशात आजमितीला 38 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ताडोबा, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा आणि बोर अशी सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. नैसर्गिक अधिवासामुळे दिवसेंदिवस राज्यातील वाघांची संख्या वाढत आहे. राज्यात 2006 साली 103, 2010 साली 169 तर 2014 साली 190 वाघ असल्याची नोंद झाली आहे. व्याघ्र संख्येत देशात महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे. राज्यात विशेष व्याघ्र दलाची स्थापनाही करण्यात आली आहे.

मध्यंतरी वन्यजीव आणि नागरिकांत होणारा संघर्ष कळीचा मुद्दा ठरला होता. या बैठकीत नैसर्गिक अधिवास निर्माण करणे, जनजागृती करणे, व्याघ्र संवर्धन याबरोबरच वन्यजीव-नागरिकातला संघर्ष टाळण्यासाठी करायचे प्रयत्न, उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.