शिवतारेंचे काळे धंदे पुराव्यानिशी बाहेर काढणार

सासवड – पुरंदर तालुक्‍यातील जलयुक्त शिवार योजनेतील 200 कोटींचा भ्रष्टाचार विजय शिवतारेंच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे हिमनगाचे फक्त टोक आहे. लवकरच त्यांचे सगळे काळे धंदे पुराव्यानिशी बाहेर काढणार आहे. तालुक्‍यातील अवैध धंद्याबाबतीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका करणाऱ्यांना पुरंदरची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे, अशी टीका कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर केली.

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा खळद (ता.पुरंदर) येथील माऊली गार्डन येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जगताप यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर टीका केली. जगताप म्हणाले की, तालुक्‍यातील सगळे वाळूचे धंदे, दारूचे धंदे, अवैध धंदे यांनीच चालू करून नवीन पिढीला वाममार्गाला लावण्याचे काम केले आहे. पुरंदर तालुका पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस झालेला आहे. जलसंपदा मंत्री पुरंदरचे असूनही जनता पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून आहे. लवकरच तालुक्‍यातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचून पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

पिस्तूल परवान्यासाठी शिफारस पत्र
मंत्रिमहोदयांनी पुरंदर तालुक्‍यातील कार्यकर्ते, ठेकेदार व वाळू माफियांना पिस्तुलांचे परवाने मिळण्यासाठी तीस शिफारस पत्रे दिली आहेत. एकीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरंदरचा बिहार केला आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे खिरापतीसारखे आपल्या कार्यकर्त्यांना पिस्तुलाचे परवाने दिले जात आहेत. नेमका यांनाच पुरंदरचा बिहार करायचा आहे की काय, अशी टीका संजय जगताप यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)