तिंरगी ज्युनियर महिला हाॅकी स्पर्धा : भारताचा न्यूझीलंडवर विजय

कॅनबेरा : शर्मिला देवीच्या दोन गोलांच्या जोरावर भारतीय ज्युनियर महिला हाॅकी संघाने तीन देशाच्या टूर्नामेंटमध्ये आपल्या तिस-या सामन्यात न्यूझीलंडला ४-१ ने पराभूत करत विजय संपादित केला. यासह भारतीय संघाचा स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला.

न्यूझीलंडच्या ओलिविया शेनोन हिने पहिल्या सत्राच्या चौथ्याच मिनिटाला पेनल्टी काॅर्नरव्दारे गोल करत भारतावर १-० आघाडी घेतली. त्यानंतर काही वेळातच १२ व्या मिनिटाला शर्मिलाने गोल करत भारतीय संघास १-१ अशी बरोबरी साधून दिली.

दुस-या सत्रात दोन्ही संघाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण दोन्हीही संघाला गोल करण्यास हाती अपयश आले. भारतीय संघास २७ व्या मिनिटाला पेनल्टी काॅर्नर मिळाला आणि याचा फायदा घेत ब्यूटी डुंगडुंगने गोल करत २-१ ने आघाडी मिळवून दिली.

तिस-या सत्रात शर्मिलाने ४३ व्या मिनिटाला गोल करत भारताला ३-१ ने आघाडीवर नेले. आजच्या सामन्यातील शर्मिलाचा हा दुसरा गोल ठरला. त्यानंतर ४८ व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी काॅर्नर मिळाला. या पेनल्टी काॅर्नरव्दारे लालरिंडिकीने संघाकरिता चौथा गोल करत संघास ४-१ ने आघाडीवर नेलं. ही आघाडी शेवटपर्यत कायम राहिली आणि भारताने ४-१ ने सामना खिशात घातला. आता रविवारी आॅस्ट्रेलियाविरूध्द भारतीय संघ स्पर्धेतील चौथा आणि अखेरचा सामना खेळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.