पुणे – सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. संविधानिक पदावर असलेले नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावरुच आता सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यांना घरी पाठविण्याची वेळ आली आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांबद्दल सुळे यांनी चिंता व्यक्त करीत या सर्व प्रकारास महायुतीचे सरकार जबाबदार आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांत मुलींच्या अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहे. यावरुन राज्य सरकारचा धाकच राहिला नाही. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली.
फडणवीस यांनी हातात बंदूक घेऊन मतासाठी पोस्टरबाजी करणे चुकीचे आहे. त्यांना असे करायचे असेल तर बॉलीवूडमध्ये जावे. झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनाच असे करावेसे वाटणे म्हणजे सरकार जाण्याची वेळ आलेली आहे. सत्तेतील आमदाराला पक्ष सोडण्याची वेळ येते म्हणजे सत्ता जाण्याची, सरकार जाण्याची वेळ आली आहे. सत्तेतील आमदाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही गंभीर गोष्ट आहे, असे सुळे म्हणाल्या.