प्रवाशांवर आली बसला धक्का देण्याची वेळ

बोधेगाव: प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतू करणाऱ्या वाहनांकडून बसकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एकीकडे शिवनेरी, शिवशाही, अश्‍वमेध व शीतल सारख्या वातानुकूलित बस रस्त्यावर आणत आहे. पण त्याच वेळी ग्रामीण भागातील लालपरीकडे दुर्लक्ष होत असल्याने ती रस्त्यात बंद पडल्यावर प्रवाशांनाच धक्का मारून ती सुरू करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतुकीतही एसटी महामंडळाने सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील बसस्थानकावर शेवगाव आगाराची गेवराईकडे जाणारी शेवगाव-गेवराई ही बस गुरुवारी थांबली असता अचानक बंद पडली.

चालकाने बराच वेळ खटाटोप करुन देखील बस सुरु होईना. शेवटी प्रवाशांनाच खाली उतरुन या लालपरीला धक्का देण्याची वेळ आली. यावेळी गावातील रियाज सय्यद, बाबा सय्यद, बापूराव चव्हाण, दत्तात्रय मिसाळ, गणेश चव्हाण यांनीही प्रवाशांना बसला धक्का देण्यास मदत केली. बऱ्याच अंतरापर्यंत बस ढकलत नेल्यावर ती सुरु झाली. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 1948 मध्ये एसटी महामंडळाची स्थापन झाली. सध्या महामंडळाच्या अनेक बस या कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे चालक-वाहकांबरोबर प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. यातून रात्री-अपरात्री प्रवाशांना बसमधून प्रवास करताना बस बंद पडल्याने ताटकळत थांबावे लागते. नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांना वेळेवर न पोहोचल्याने संबंधितांची बोलणी खावी लागतात. यातून अनेक जण खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळतात. यातून बसच्या उत्पन्नावर ही परिणाम होतो. यासाठी परिवहन महामंडळाने कालानुरूप बदल करुन लालपरीचे केवळ बाह्यअंग न बदलता यांत्रिक व तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्याची गरज आहे.


मी स्वत: वाहनचालक असल्याने अडीअडचणीच्या काळात इतर चालकांना शक्‍य होईल ती मदत करत असतो. अनेकदा एस. टी. महांडळाच्या बसेस टायर खराब होऊन अथवा मशिन बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या दिसतात. यातून प्रवाशांची हेळसांड होते. त्यामुळे महामंडळाने ग्रामीण भागात काळानुरुप नवीन बसेस सुरु करणे गरजेचे आहे.
मुनवर शेख,सामाजिक कार्यकर्ते, बोधेगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.