‘डॉ.आंबेडकरांनी दिलेले संविधान स्वीकारायचे की गोळवलकरांचे विचार हे ठरविण्याची वेळ’

जितेंद्र आव्हाड : नागरिकत्वाचा कायदा लागू करणे हा संविधानावर हल्ला

पुणे – सध्या देशात सुरू असणारी एनआरसीच्या विरोधातील लढाई ही जातीय नाही तर, या देशात जो सद्‌भावनेने राहत आहे अशा प्रत्येक भारतीय नागरिकांची आहे. नागरिकत्वाचा कायदा लागू करणे म्हणजे संविधानावर हल्ला आहे. जर्मनीमध्ये हिटलरने जे केले तेच सध्या भारतात घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी येथे टीका केली. देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान स्वीकारायचे की गोळवलकर यांचे विचार मान्य करायचे हे ठरविण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकायत, कुल जमाअत-ए-तजीम आणि संविधान बचाव मंचच्यावतीने एनआरसी-एनपीआर आणि सीएए विरोधी महासभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहर कॉंग्रेस शहाराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, खासदार जिग्नेश मवानी, जहीद भाई, निरज जैन आदी उपस्थित होते.

आव्हाड म्हणाले, ही फक्‍त मुस्लीम समाजाची लढाई नाही. आसाममध्ये आजसुद्धा 19 लाख नागरिक हे निर्वासित कॅम्पमध्ये राहत आहेत, त्यातील 14 लाख हिंदू आहेत. आता त्यांनासुद्धा बाहेर काढणार का. या नागरिकत्व कायद्यामुळे ईशान्य भारतात अशांतता पसरली आहे. ईशान्य भारतात जे झाले ते काही दिवसांनी पूर्ण भारतात होईल. गोर-गरीब नागरिक कागदपत्रे कुठून आणणार, जो भारतीय नागरिक जगण्यासाठी रोजचा संघर्ष करत आहे तो आपली ओळख कशी पटविणार त्यातून असंतोषच जास्त पसरणार आहे. नागरिकत्वाचा कायदा लागू करणे ही तर सुरुवात आहे असे मानतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या बोलण्याचा विपर्यास केला : आव्हाड
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या महान नेत्या होत्या. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. मी जे काही बोललो त्याचा विपर्यास केल्याचे सांगत आपण इंदिरा गांधी यांच्यावर टीका केलीच नव्हती, असे स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे दिले. इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला, असे वक्तव्य आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. या टीकेनंतर पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.