पुणे – गेल्या सहा महिन्यांपासून करोनाविरुद्धच्या लढ्यात सक्रीय सहभागी असलेल्या ठेकेदारी पद्धतीवरील सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिकेने थकवले आहे. हे वेतन त्वरीत द्यावे अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्थायी समितीकडे पत्राद्वारे केली आहे.
महापालिकेचे हे ठेकेदारी पद्धतीवरील कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून स्वतःच्या जीवाची तसेच कुटुंबाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून करोना योद्धा म्हणून कार्यरत आहेत. यामध्ये झाडणकाम कर्मचारी, अतिक्रमण निर्मूलनातील कर्मचारी, सुरक्षा विभागातील कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी हे महापातिकेच्या विविध कोविड सेंटर आणि दवाखाने, प्रसूतीगृहे, करोना केअर आस्थापना पुणे महापालिकेचे विविध भवन याठिकाणी हे कर्मचारी गेली सहा महिने सेवा देत आहेत. याचबरोबर महापालिकेच्या समाज विकास विभाग मार्फत समूहसंघटिका आणि “आशा वर्कर’ कार्यरत आहेत. त्यांना महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारचा आरोग्याच्या संरक्षणाचा लाभ होत नाही, असे डॉ. धेंडे यांचे म्हणणे आहे.
या कर्मचाऱ्यांना दोन ते तीन महिने वेतन अदा केले जात नाही. याहून पुढे या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आदेश देखील दिले नाही. याची माहिती घेतल्या नंतर असे लक्षात आले की, पुणे महापालिकेच्या संबंधित खातेप्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम होत आहे. या प्रशासकीय दिरंगाईचा फटका या कर्मचाऱ्यांना बसत आहे, अशी टीका डॉ. धेंडे यांनी केली आहे.
या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोफत आरोग्य सुविधा देणे आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपयांचा विमा उतरवणे, या प्रकरणी प्रशासकीय दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी आणि खातेप्रमुखांवर कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन रोखले जावे, अशा मागण्या केल्या आहेत.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर तथा नगरसेवक