वडूज – ऐन लग्नसराईच्या हंगामात करोनाने थैमान घातल्याने लॉकडाऊनच्या काळात छायाचित्रणाचा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. व्यवसायाअभावी अनेक छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अडचणीतील या व्यावसायिकांना शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मार्च ते मे महिन्यांमध्ये साखरपुडा, लग्न अशा शुभ कार्याची रेलचेल असते.
यंदाचा लग्न हंगाम अडचणीत आल्याने फोटोग्राफर आर्थिक संकटात सापडले आहेत. फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांचा प्रमुख आधार असलेला लग्नसराईचा हंगाम करोनामुळे प्रभावित झाल्यानंतर या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली आहे. या लग्न हंगामातील उलाढालीवरच त्यांचा वार्षिक आर्थिक व्यवहार अवलंबून असतो. फोटोग्राफी व्यवसायात होणारे बदल, आधुनिक सामग्रीचा वापर यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी व लग्न हंगामाची तयारी म्हणून उसनवारी करत लाखो रुपयांची जुळवाजुळव करत कॅमेरा व पूरक साहित्य खरेदी केले. मात्र, लग्नाचा हंगाम थांबला.
परिणामी अनेक छायाचित्रकार आर्थिक अडचणीत अडकले आहेत. सद्यस्थितीचा विचार करता धुमधडाक्यात लग्न समारंभ सुरू व्हायला किती वेळ लागेल हे अनिश्चित असल्याने फोटोग्राफर व्यवस्था सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे हजारो फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
केवळ फोटोग्राफी व्यवसाय हाच कुटुंबाच्या उत्पन्नाचे एकमेव साधन असणारे अनेक फोटोग्राफर आहेत. त्यामुळे शासनाने या व्यावसायिकांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. फोटोग्राफी कलेवर छायाचित्रकाराचे कुटुंब चालते. विविध अडचणींना तोंड देत असतानाच करोनामुळे व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत, असे मायणीचे सतीश डोंगरे यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर शा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी वडूज येथील ज्येष्ठ छायाचित्रकार दिलावर मुल्ला उर्फ एम. दिलावर यांनी केली आहे.