छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ

मल्हारपेठ – धार्मिक, सामाजिक आदी कार्यक्रमांबरोबर लग्न, हळदी, नववधु-वराचा साजशृंगार आदी गोष्टी टिपणारा ग्रामीण भागातील छायाचित्रकार सध्या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीच्या झळा सोसत आहे. लग्न, समारंभ बंद असल्याने व्यवसायही बंद आहे. परिणामी आपला चरितार्थ भागविणे छायाचित्रकारांना कठीण झाले आहे.

सध्या कराड ग्रामीण भागामध्ये सुमारे 1 हजाराहून अधिक छायाचित्रकार व्यवसाय करत आहेत. गत वर्षाच्या तुलनेत यंदा करोना व लॉकडाऊनमुळे लग्न तसेच धार्मिक, सामाजिक अशा विविध कार्यक्रमांवर प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे या कार्यक्रमांत घट झाल्याचे दिसत आहे. सध्या सर्वच ठिकाणी आर्थिक मंदीचे सावट असल्याने या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
आधुनिकीकरण होत असल्याने चांगल्या कंपन्यांचे मोबाईल घरगुती फोटोग्राफी करत आहेत. तर अनेकांनी 4 ते 5 हजार रूपये किंमतीच्या डिजिटल कॅमेऱ्यांची खरेदी केली आहे.

मात्र, लॉकडाऊन व करोनामुळे छोट्या-छोट्या छायाचित्रकांरानीही घरी बसावे लागले आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अनेक व्यवसायिकांनी या व्यवसायाला रामराम केला आहे. तर अनेकजण रामराम करण्याच्या तयारीत आहेत. काही छायाचित्रकारांनी जोड व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनमुळे तोही व्यवसाय ठप्प होता. सध्या पावसाळ्यामुळे पुढील चार महिने व्यवसाय मंदीत असल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.