वॉशिंग्टन – अमेरिकेत एका कृष्णवर्णीय कैद्याच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी जोरदार निदर्शने सुरू आहेत. त्यातच शुक्रवारी अचानक अमेरिकेन अध्यक्षांच्या राजप्रासादासमोर अचानक मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी काही काळासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील बंकरमध्ये नेऊन लपवून ठेवले होते. पण नंतर लगेचच त्यांना तेथून बाहेरही काढण्यात आले. अमेरिकेच्या अध्यक्षांना बंकरमध्ये लपून राहावे लागण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच वेळ आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी बंकरमध्ये लपून बसावे लागल्याची माहिती व्हाईटमधील एका प्रत्यक्षदर्शी इसमाने न्यूयॉर्क टाईम्स या दैनिकाला दिली आहे. त्या वृत्तामुळे मोठीच खळबळ माजली आहे. निदर्शकांपैकी मोठा जमाव व्हाईट हाऊसच्या दिशेने निघाला असल्याचे पाहिल्यानंतर अध्यक्षांना बंकरमध्ये लपवण्यात आले, असे या इसमाचे म्हणणे आहे. तथापि, सुमारे तासाभरानंतर जादा सुरक्षा कुमक मागवून निदर्शकांवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि ट्रम्प यांना बंकरमधून बाहेर काढण्यात आले.
शुक्रवारी रात्री व्हाईट हाऊसच्या बाहेर इतक्या मोठ्या संख्येने निदर्शक जमल्याचे पाहून ट्रम्प यांची सुरक्षा यंत्रणाही आश्चर्यचकित झाली होती. ट्रम्प यांच्यासमवेतच त्यांच्या पत्नी आणि मुलीलाही बंकरमध्ये लपवण्यात आले होते काय याची माहिती मात्र मिळू शकली नाही. अमेरिकेतील ही निदर्शने अजून नियंत्रणात आलेली नाहीत. त्या देशातील पंधरा प्रांतात नॅशनल गार्ड पाचारण करण्यात आले आहेत.