पुणे – लॉकडाऊन टप्याटप्याने हटवले जात आहे. त्यामुळे नेहमी गर्दीने भरलेले शहर आता पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याची प्रचिती शनिवारी टिळक रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर झालेल्या गर्दीवरून दिसून आली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात होते.
शहरातील किराणा, इलेक्टिक, इलेक्ट्रॉनिक्स, स्टेशनरी यांसह अन्य दुकाने सुरू झाल्यामुळे नागरिक जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत आहे. बाजीराव रस्त्याच्या पूर्वेकडील म्हणजेच नाना पेठ, रविवार पेठ, भवानी पेठ, कसबा पेठ हा भाग “रेड झोन’ असल्यामुळे येथे निर्बंध लागू आहेत. मात्र, अन्य शहरात बहुतांश भाग खुला करण्यात आला.
विशेषत: बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक्स, इलक्ट्रिक, स्पोर्टस, कपडे, खेळणी यांसह खाद्यपदार्थांची दुकाने अधिक आहेत. त्यामुळे या वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी सकाळी या दोन्ही प्रमुख रस्त्यांवर गर्दी केल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर वाहतूक विभागाकडून सिग्नल यंत्रणाही सुरू करण्यात आली होती. त्यामुळे बाजारात आता हळूहळू व्यापार सुरू होण्याची आशा आहे.