पोलीस, पीएमपी अधिकाऱ्यांकडून पाहणी ः भोसरी बस थांबा स्थलांतरित करणार
निगडी – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या निगडी येथील टिळक चौकातील भोसरी बससाठीचा थांबा वाहतूक कोंडीला कारण ठरत असल्याने तो स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिका, पीएमपीएमएल, वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 16) पाहणी करून हा निर्णय घेतल्याने या चौकातील वाहतूक कोंडीच्या त्रासापासून नागरिकांची सुटका होणार आहे.
नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्त व पीएमपीएमएल अध्यक्षांना निवेदन पाठवून बस थांबा अन्यत्र स्थलांतरीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप यांनी वाहतूक पोलीस निरीक्षक रविंद्र निंबाळकर, पीएमपी निगडी डेपोचे व्यवस्थापक सतिश गव्हाणे, महापालिकेचे उपअभियंता डी. डी. पाटील, विजय भोजने, अजय सूर्यवंशी, सतिश वाघमारे यांनी एकत्रितपणे या चौकाची पाहणी करत आढावा घेतला. निगडीतील टिळक चौक हा शहरातील प्रमुख चौकांपैकी एक असून तो कायम गजबजलेला हा चौक आहे. तेथून भोसरी, तळवडेकडे जाणारा रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत आहे.
त्यात भोसरीकडे जाणाऱ्या बसचा थांबा याच रस्त्यावर असल्याने तेथे बसेस, रिक्षा आणि नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना बस चालकांबरोबर इतर वाहनचालक व नागरिकांनाही करावा लागतो. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महाराणा प्रताप उद्यानासमोरील जागेत बस उभ्या करण्यात येतील. तेथे बॅरिकेट्स लावून बसेससाठी लेन केली जाईल. तेथून भोसरी, आळंदी, देहू, तळवडे, चऱ्होली, म्हालुंगे वासुली शिंदे या बसेस प्रवाशांना उपलब्ध होतील. या निर्णयामुळे बस चालक, प्रवासी आणि वाहन चालक या सर्वांची त्रासापासून सुटका होणार असल्याचा दावा नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केला.