पुस्तक परिक्षण: काव्यातून टिळकदर्शन

आश्‍लेषा महाजन

वज्र विजेचे वक्षावर झेलून घेणाऱ्या
सह्याद्रीच्या उंच कड्याने दिधली छाती
आणि घडविले पोलादाने मनगट त्याचे अन्यायाच्या विटा विटा उस्कटण्यासाठी
ह्या आहेत मंगेश पाडगावकरांच्या टिळकांविषयीच्या कवितेतील ओळी. लोकमान्य टिळकांच्या कार्यकर्तृत्वाची मोहिनी आजही कवी-लेखकांना ऊर्जा देत असते. टिळकांविषयीच्या शेकडो कविता एकत्र आस्वादण्यासाठी, अभ्यासण्यासाठी “काव्यातून टिळकदर्शन’ हे स्वप्नील पोरे यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक म्हणजे लोकमान्य टिळकांविषयीचा काव्यमय दस्तऐवज आहे. डॉ. दीपक टिळक यांनी प्रस्तावनेत त्याला “काव्य-कोलाज’ अशी यथोचित उपमा दिली आहे. हे पुस्तक “भारतीय इतिहासात सदैव तळपत राहिलेल्या टिळक युगास’ अर्पण करण्यातले काव्यही बोलके आहे.
1947 मध्ये केसरी मराठा संस्थेने का. रं. वैशंपायन यांनी संपादित केलेला “काव्यमय टिळक’ हा ग्रंथ प्रकाशित केला होता. नंतरच्या काळातही अनेक कवींनी टिळकांविषयी काव्यरचना केल्या. आता नव्या रूपात आणि रसग्रहणाची व काही माहितीपूर्ण संदर्भमूल्यांची जोड देत “काव्यातून टिळकदर्शन’ स्वप्नील पोरे यांनी हे पुस्तक साकारले आहे. पुस्तकात लोकमान्यांचे व कवींचे फोटो, रेखाचित्रे, पूर्वी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे, उर्दू कवितांच्या छायाप्रती छापल्या आहेत. मुखपृष्ठकार अरुण सूर्यवंशी आणि रेखाचित्रकार प्रतीक काटे यांच्या सजावटीमुळे पुस्तकाचे दृश्‍यमूल्यही वाढले आहे. टिळकांवरील सर्वच कविता यात घेतलेल्या नाहीत. विपुल काव्य-सागरातून जे निवडले, ते तुमच्याकडे सोपवत आहे. असे लेखकाने मनोगतात स्पष्ट केले आहे.
टिळकांसारख्या युगपुरुषाच्या देदीप्यमान जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांवर नवोन्मेषशाली कवींना काव्य न स्फुरेल, तरच नवल. कवी गोविंदांपासून गोविंदाग्रज, तांबे नि केशवकुमारांपर्यंत, सावरकरांपासून बोरकर-कुसुमाग्रज-विंदा-बापट नि पाडगावकरांपर्यंत, हसरत मोहानींपासून सरोजिनी नायडूंपर्यंत अनेक कवींनी मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, इंग्लिश अशा विविध भाषांतून टिळकांना काव्यांजली अर्पण केली आहे. पोवाडे, पदे, गीते, स्फूर्तिगीते, मुक्‍त-काव्य अशा विविध आकृतिबंधात नि वृत्त-छंदांत या कवींनी कृतज्ञता व्यक्‍त केली आहे. गोविंदाग्रज, केशवसुत इत्यादी टिळकांचे समकालीन कवी आहेत. काही टिळक-युगानंतरचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वप्नील पोरे यांनी ह्या सर्व कवितांची काळानुरूप सांगड घालत असतानाच स्वातंत्र्याच्या इतिहासाचा धावता आढावाही घेतला आहे. स्वप्नील पोरे स्वत: मर्मज्ञ कवी व जाणकार अभ्यासक आहेत. कवितेचे स्वागतशील रसग्रहण आणि त्या त्या कवींची वैशिष्ट्येही त्यांनी जाता जाता सांगितली आहेत. काव्यरसिकांनी, इतिहासप्रेमींनी आणि रसिकांनी संग्रही ठेवावे, सातत्याने आस्वादावे असे हे पुस्तक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)