नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या प्रसारासाठी चीनला जबाबदार ठरवल्यानंतर चीनला जगभरातून टार्गेट करण्यात येत आहे. त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्यात येत आहे. भारत आणि अमेरिकेत बॅन करण्यात आलेल्या टिकटॉक या ऍपला घरघर लागली असल्याचे दिसत आहे. कारण टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी राजीनामा दिला आहे.
एका आंतरराष्ट्रीय इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. केविन मेयर यांनी निवेदन प्रसिद्ध करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. अमेरिकेत बंदी घातल्याच्या निर्णयाविरोधात टिकटॉक आणि कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरोधात न्यायालयात धाव घेतल्याच्या काही दिवसांमध्येच मेयर यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
केविन मेयर यांनी राजीनामा देताना कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “खूप जड अंतकरणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे”. केविन मेयर यांच्या जागी जनरल मॅनेजर व्हेनेसा हंगामी सीईओ म्हणून काम पाहणार आहेत. जून महिन्यात केविन मेयर यांनी टिकटॉकच्या सीओओ पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने टिकटॉसहित ५९ चिनी अॅपवर राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून निर्णय घेण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टिकटॉकवर बंदी आणण्याच्या निर्णय प्रक्रियेला वेग दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला अमेरिकेत व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे. यावरुन टिकटॉकच्या कर्मचाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प चीनविरोधात भावना भडकवत असून फेरनिवडणुकीसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नुकतेच अमेरिकेत टिकटॉकच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेशावर स्वाक्षरी केली होती. या आदेशात टिकटॉकला अमेरिकेतील व्यवहार सुरु ठेवायचा असेल तर त्यांना ९० दिवसांत विक्री करावी लागेल आणि सर्व उपलब्ध डाटा डिलीट करावा लागेल असा उल्लेख आहे.