तुकोबांची देहूनगरी भक्‍तिरसात न्हाली

इंद्रायणीकाठ फुलला : राज्यभरातून दिंड्या, वारकरी दाखल

श्रीक्षेत्र देहूगाव – आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहूनगरीतून पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, पालखीचे सोमवारी (दि. 24) प्रस्थान होणार आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल झाले आहेत. तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्याचे यंदाचे 334 वे वर्ष आहे. यानिमित्ताने देहूत पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ग्यानबा-तुकारामाचा अखंड जयघोष सुरू असून, सर्वत्र हरिनाम आणि भागवत धर्माच्या पताकांचे वातावरण आहे. रविवारच्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्यामुळे भाविकही सुखावल्याचे पाहावयास मिळाले. इंद्रायणी नदीकाठ, मुख्य मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर परिसर गर्दीने फुलला आहे.

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा सोमवारी श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. सोहळ्यासाठी स्थानिक प्रशासन, शासकीय यंत्रणांसह स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था, भाविकांना सेवा, सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज आहेत. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक, दिंड्या येत आहेत. मुख्य मंदिरात, वैकुंठस्थान मंदिरात, पालखी रथावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पालखी प्रस्थानचे धार्मिक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देहूनगरी अखंड भक्‍तीरसात चिंब झाली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने चोवीस तास अखंडित शुद्ध पाणी पुरवठा, महावितरणकडून विद्युत पुरवठा, गावाबाहेर राज्य परिवहनचे एसटी बसेस, पुणे महानगर परिवहन (पीएमपी) च्या बसेस सुविधा उपलब्ध केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, परिचारीका, पुरेसा औषध साठा, विशेष म्हणजे वारकऱ्यांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या चार ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग उभारण्यात आले आहेत. तसेच चार रुग्णवाहिका सज्ज करण्यात आली आहेत.

ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता, साफसफाई सुरू असून, जंतुनाशक पावडर टाकण्यात आले आहे. सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक प्रशासन, शासकीय यंत्रणांसह विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था वारकरी, भाविकांना सेवा, सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांसह, दिंड्या दाखल होत आहेत.
देहूत येणाऱ्या मार्गावर सर्व वाहनांना “नो-एन्ट्री’

सोहळ्यासाठी पोलीस अधिकारी यासह पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारीसह, गृहरक्षक दलाच्या तुकडीसह साध्या वेशातील गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहे. गजराज बोटिंग क्‍लबचे जीवरक्षक तसेच घाट परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रस्थान व मार्गस्थ दिनी दिवसभर देहूत येणाऱ्या सर्व मार्गावर अर्थात देहूरोड ते देहू, आळंदीमार्गे तळवडे, चाकण-तळेगाव महामार्गावरील देहूफाटा मार्गावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांवर, रस्त्यावरच लावण्यात येणारे हातगाड्या, पथारीवाले तसेच फ्लेक्‍स, बॅनरवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, दिलीप भोसले यांनी दिली.

असा असेल पालखी प्रस्थान कार्यक्रम
पहाटे 5.00 : “श्रीं’ची व शिळा मंदिर महापूजा
पहाटे 5.30 : तपोनिधी नारायण महाराज “पालखी सोहळा जनक’ समाधी महापूजा
सकाळी 10 ते 12 : पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काला कीर्तन
सकाळी 9 ते 11 पुढे : संत तुकाराम महाराज पादुका महापूजा (इनामदार वाडा)
दुपारी 2.30 : पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ
सायंकाळी 5.00 : पालखी मंदिर प्रदक्षिणा
सायंकाळी 6.30 : पालखी सोहळा मुक्काम इनामदार वाडा, देहू. “श्रीं’ची महाआरती

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.