मुुंबई – तिहार जेलमधील एका कैद्याची टांगती “तलवार’ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भोवती फिरत असल्याने ते अस्वस्थ आहेत. त्यामुळेच पवार बेताल वक्तव्य करीत असल्याची टिका करतानाच पवारांमुळे खरोखरच महागठबंधन झाले आहे का, असा सवाल भाजपाचे नेते व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी देशभरातील विरोधकांचे महागठबंधन करण्यासाठी मी पुढाकार घेतल्याने मोदी माझ्यावर टिका करीत असल्याचा आरोप शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांवर टिका केली. पवारांमुळे खरोखरच महागठबंधन झाले आहे का, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती हे त्यांच्यासोबत आहेत का, असे सवाल करतानाच विरोधी पक्षांचे महागठबंधन एकत्र आहे असे शरद पवारांनी म्हणणे म्हणजे सुप्रिया, अजित, पार्थ, रोहित असे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आहे असे म्हणण्यासारखे आहे, असा टोला तावडे यांनी लगावला.
निवडणुकीनंतर “चौकीदार को जेल में भेजूंगा’ हे राहुल गांधी यांचे वाक्य हास्यास्पदच आहे. ते स्वतः जामिनावर आहेत. त्यांचा मेहुणा जेलमध्ये जाण्याच्या तयारीत आहे आणि भाषा दुसऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची करीत असल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांचाही तावडे यांनी समाचार घेतला. आंबेडकर यांचे सरकार येण्यासाठी त्यांनी तेवढे उमेदवार तरी उभे केले आहेत का, याची त्यांनी माहिती घ्यावी, असा टोला त्यांनी लगावला.
तेव्हा अनिल अंबानी कसे चालले?
राफेल प्रकरणी राहुल गांधी अनिल अंबानींचे नाव घेउन टीका करतात. पण राफेलबाबत सर्व खुलासे सप्रमाण झाले आहेत. पण जेव्हा महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. तेव्हा मुंबई मेट्रोचे काम अनुभव असलेल्या डीमआरसीला डावलून अनिल अंबानींच्या कंपनीला देण्यात आले. तेव्हा अनिल अंबानींच्या कंपनीला मेट्रोच्या कामाचा किती अनुभव होता, असा सवाल करीत हे काम पुढे सहा वर्षे रखडल्याने प्रकल्पाची किंमत 84 टक्क्यांनी वाढली. ही वाढलेली रक्कम गब्बर सिंग टॅक्सच्या माध्यमातून मुंबईकरांच्या खिशातूनच वसूल करण्यात आली, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला.