करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनंतर पाऊल
पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत करोना प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. परिसरातील न्यू मोदीखाना पाठोपाठ भीमपुरा भागात बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर परिसरात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. 14 मेपर्यंत लष्कर परिसरात कठोर लॉकडाऊन पाळला जाणार आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत फक्त औषध दुकानेच खुली असतील. नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी केले आहे. लष्कर परिसरात बांबू, जाळ्यांनी बंद केलेले गल्लीबोळ, औषध विक्रीची दुकाने वगळता अन्य दुकानांचे शटरडाऊन, शिवाजी मार्केटसह प्रमुख बाजारपेठांच्या परिसरात सामसूम अन रस्त्यांवर तुरळक रहदारी असे चित्र सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरात पाहावयास मिळत आहे.
दरम्यान, बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय-57 आणि महादजी शिंदे हायस्कूलमधील करोना वॉर्डमध्ये आजअखेर 53 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
“डब्लूएचओ’ समन्वयकांकडून पाहणी
जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्लूएचओ) राज्य समन्वयक डॉ. कमलाकर अर्जुनलष्करे यांनी सरदार पटेल रुग्णालयाला भेट देत सुविधांची पाहणी केली. यात रुग्णालयातील खाटांमधील अंतर, बेडशीट, ब्लॅंकेटची गुणवत्ता, मास्क, व्हेंटिलेशन आदी वस्तू डब्लूएचओच्या मानकांनुसार तपासून रुग्णालयाचे काम समाधानकारक असल्याचे सांगितले आहे, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांनी स्पष्ट केले.