मुंबई – शाहरूखच्या पठाण या आगामी चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणाही झालेली नाही. मात्र, त्याचे चाहते चातकासारखी या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. त्याचे कारण तब्बल तीन वर्षांनंतर शाहरूखने कोणता चित्रपट स्वीकारला आहे.
त्यामुळे पठाण आताच बॉलीवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.
या चित्रपटाबाबत बातम्याही सोडल्या जात आहेत. त्यातली लेटेस्ट म्हणजे पठाणमध्ये यशराज फिल्मस्चा टायगर अर्थात सलमान खानही झळकणार असल्याचे वृत्त आहे. चित्रपटात हे दोघे रशियन माफियांशी एकत्रितपणे लढताना दाखवले जाणार आहे.
यात टायगर असलेला सलमान शाहरूखच्या मदतीला धावून येतो असा क्रम ठरवण्यात आला आहे. आता सलमान आला म्हणजे त्याची ग्रॅंड एन्ट्रीही असणे क्रमप्राप्त असते. त्याच्या सगळ्या चित्रपटांत हा साऊथ स्टाईल तडका असतोच.
त्यामुळे सलमानची एन्ट्री खास हेलिकॉप्टरमधून दाखवण्यात येणार आहे. बरे तो असा आला तर नुसताच हाय-बाय करून परतलेला कसे प्रेक्षकांना चालेल? त्यासाठी ऍक्शन सीनचा भरणाही केला जाणार आहे.
तेही तब्बल 20 मिनिटांचे असणार आहेत. शाहरूख आणि सलमान तसे मित्रच. मध्यंतरी त्यांचे बिनसले होते. नंतर पुन्हा एकत्र आले.
आता शाहरूखचे चित्रपट तितकासा चांगला व्यवसाय करत नाहीत. त्यालाही याची कल्पना आल्यामुळे त्याने गॅप घेतला. प्रत्येक सुपरस्टारच्या करिअरमध्ये हे असे वळण येतच असते.
सध्या शाहरूख तेथेच चाचपडतो आहे. त्यामुळे बराच विचार केल्यावर पठाणसाठी तो तयार झाला आहे. पण त्यात कोणता मसाला कमी पडायला नको याचीही दक्षता घेतली जाते आहे. त्यामुळेच टायगरलाही सोबत घेतले जाते आहे. बातम्या तर अशाच आहेत. खरे खोटे लवकरच कळेल.