पवारांच्या दौऱ्याने शाहूनगरीतील राजकीय समीकरणे बदलणार
प्रशांत जाधव/सातारा: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ढासळू लागलेल्या बालेकिल्ल्यात, सातारा येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे रविवारी जोशात स्वागत करण्यात आले. सातारच्या दोन्ही राजांशिवाय पवारांचा हा पहिलाच सातारा दौरा असतानाही त्यांच्या स्वागताला तरुणाईची झुंबड उडाली होती. हजारो तरुणांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य स्वागतामुळे भारावलेल्या शरद पवारांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या असल्या तरी या वयातही त्यांचा उत्साह, आवेश पाहून “टायगर अभी जिंदा है’ याची प्रचिती सातारकरांना आली. या भव्य स्वागतामुळे पवारांची क्रेझ पुन्हा दिसली असून सातारा जिल्ह्यातील बिघडलेली राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सातारा शहरातील रयत शिक्षण संस्थेत पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रवादीच्यावतीने रयत शिक्षण संस्था, पोवई नाका, जिल्हाधिकारी कार्यालय, बॉम्बे रेस्टॉरंट ते कल्याण रिसॉर्ट अशी रॅलीचे काढण्यात आली. या वयातही आपल्या लाडक्या नेत्याचा सळसळता उत्साह पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आलेले हजारो तरुण व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. “शरद पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, “टायगर अभी जिंदा है’, “कोण आला रे, कोण आला, मोदी-शहाचा बाप आला’ अशा घोषणा देत युवकांनी रॅली मार्गाचा परिसर दणाणून सोडला. या रॅलीमुळे साताऱ्यातील वातावरण राष्ट्रवादीमय झाल्याचे पाहायला मिळाले. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यावर शरद पवार हे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचल्यावर युवकांनी पवार यांना गराडा घातला. तरुणाईचा प्रतिसाद पाहून नेते सुखावले आहेत.
सध्या राज्यात राष्ट्रवादीची पडझड सुरू असली, एकामागोमाग एक शिलेदार सोडून जात असले तरी शरद पवारांना जनेतेतून मिळत असलेली सहानुभूती व प्रतिसाद पाहता राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे महत्त्व कायम राहील, काही मतदारसंघांमध्ये क्रांती होईल, असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. आजकाल तरुण आणि धडाकेबाज नेत्यांची क्रेझ युवा वर्गात असल्याचे दिसून येते. मात्र, शरद पवारांबाबत गणित जरा वेगळेच आहे. ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेले शरद पवार एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने पक्षाचा डोलारा सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पवारांचा चाहता वर्ग राज्यात वाढताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील सध्याच्या अनेक नेत्यांचा राजकीय उदय शरद पवारांच्या छत्राखालीच झाला. आता अनेकांनी पवारांची साथ सोडून प्रवाहाच्या दिशेने पोहायला सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागेल, असे वाटत असतानाच पवारांचा सातारा दौरा हा केवळ दौरा नसून जिल्ह्याच्या राजकारणातील घडामोडींचा “ब्लास्टर’ असेल, यात शंका नाही. पवारांचे वय अन् त्यांनी राज्य व देशाच्या राजकारणात दिलेले योगदान या मुद्द्यांची दखल युवा वर्गही घेत आहे. परिवर्तनाची चळवळ पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांचा संघर्ष पाहून जनमानसात त्यांची प्रतिमा पुन्हा उंचावत असल्याचे दिसत आहे.