बीजिंग – भारत सरकारने टिकटॉकसह 59 चिनी ऍपवर बंदी घातल्यानंतर टिकटॉक या ऍपची पालक असलेल्या “बाईट डान्स’ या मूळ चिनी कंपनीला तब्बल 6 अब्ज डॉलरचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात लडाखमध्ये सीमेवर भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाचा मोठा आर्थिक फटका “बाईट डान्स’ला बसण्याची शक्यता असल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
“बाईट डान्स’ गेल्या काही वर्षात या कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. मात्र, भारत सरकारच्या निर्णयामुळे या कंपनीला भारतातील व्यवसायच थांबवावा लागणार आहे. पर्यायाने कंपनीला 6 अब्ज डॉलरचा फटका सहन करावा लागणार आहे.
अन्य संबंधित ऍपच्या व्यवसायावर अवलंबून असलेला तोटाही या 6 अब्ज डॉलरच्या नुकसानीमध्ये गृहित धरलेला आहे. “टिकटॉक’ हे शॉर्ट व्हिडीओ शेअरींगचे ऍप “बाईट डान्स’च्याच बॅनरखाली तयार करण्यात आलेले होते. याबरोबर “हेलो’ हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ऍपदेखील “बाईट डान्स’ने तयार केले आहे. याशिवाय “व्हिगो व्हिडीओ’ हेदेखील व्हिडीओ शेअरींग ऍप “बाईट डान्स’चेच उत्पादन आहे.
मोबाइल ऍप ऍनालिसीस कंपनी “सेन्सर टूवर’च्या डाटानुसार मे महिन्यात 112 दशलक्ष लोकांनी “टिकटॉक’ डाऊनलोड केले आहे. भारतातील मोबाइलधारकांच्या 20 टक्के जणांचा यामध्ये समावेश आहे. ही संख्या अमेरिकेतील मोबाइल धारकांच्या दुप्पट आहे.