तिकीट शेवाळेवाडीचे अन्‌ उतरवतात हडपसर गाडीतळावर!

पीएमपी प्रशासनचा प्रताप : प्रवाशांनी होतोय चांगलाच मनस्ताप

हडपसर – शेवाळेवाडी डेपोच्या बसमध्ये बसून काही प्रवाशांनी पंधरा नंबर, तर काही प्रवाशांनी शेवाळेवाडी डेपो असे तिकीट काढूनही पीएमपी बसमधील शेवाळेवाडीच्या प्रवाशांना गाडीतळ येथील पीएमपी बिल्डिंगसमोर उतरवले जात आहे. अचानकपणेपणे निर्माण होणाऱ्या या परिस्थितीमुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पीएमपी बसचालक आणि वाहकांच्या दंडेलशाहीविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवासी घेऊन त्यांच्याकडून पूर्ण तिकीट घेतल्यानंतर अर्धवट ठिकाणी उतरवून त्यांना त्रास देणाऱ्या संबंधित बसचालक व वाहकांना लेखी समज देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

स्वारगेट – शेवाळेवाडी डेपो या महामार्गावर हडपसर गाडीतळ याबरोबरच शेवाळेवाडी हा महत्त्वाचा थांबा असून दररोज शेकडो प्रवासी पीएमपी बसने या मार्गावरून प्रवास करत असतात. शनिवारी असाच शेवाळेवाडी डेपोच्या एका बसमध्ये काही प्रवासी भैरोबानाला येथील थांब्यावरून बसमध्ये बसले, त्यावेळी काही प्रवाशांनी 15 नंबर, तर काहींनी शेवाळेवाडी डेपोचे तिकीट काढले.वाहकाने ते दिलेही काही वेळाने बस गाडीतळ येथील पीएमपीच्या बिल्डिंगसमोर आली असता अचानक डेपोमध्ये बस शिरू लागली. तेव्हा आकाशवाणी, पंधरा नंबर आणि शेवाळेवाडी डेपोत जाणाऱ्या प्रवाशांनी वाहकाला (कंडक्‍टर) विचारले आमचे तिकीट पुढील स्टॉपवरचे आहे. आम्हला येथे का उतरवता आहेत. तेव्हा बसच्या वाहक आणि चालकाने एका सुरात सांगितले की, बस डेपोत सीएनजी भरण्यासाठी जाणार आहे, तुम्ही खाली उतरून दुसऱ्या बसने जा. तिकीट काढल्याने नाईलाजाने प्रवाशांना दुसऱ्या बसची वाट पाहत पंधरा ते वीस मिनिटे थांबावे लागले.

यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पूर्ण तिकीट आणि अर्धवट प्रवास याबाबत येथील कंट्रोलरला विचारले असता तुम्ही त्यांनाच विचारा, असे सांगून जबाबदारी झटकली. यामुळे प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाचा तीव्र संताप व्यक्त केला. प्रवाशांना कोणतीही पूर्व कल्पना न देता बस परस्पर सीएनजी भरण्यासाठी नेतात. काही प्रवाशांना शेवाळेवाडीचे तिकीट देऊनसुद्धा आयत्या वेळी गाडीतळ येथे उतरवले जाते. वास्तविक बस सीएनजी भरण्यासाठी जाणार असेल, तर त्याबाबत तिकीट काढण्याच्या वेळी प्रवाशांना स्पष्ट कल्पना देणे व तिकिटावर तशी नोंद करणे आवश्‍यक असते, असे असताना शेवाळेवाडीतील प्रवाशांना अर्ध्यावर उतरवणे गुन्हा आहेस, अशा दंडेलशाहीला पायबंद घालणे जरुरीचे आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

अशाने खासगी वाहनांची संख्या रोडावेल?
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. बीआरटी, मेट्रो, वातानुकुलीत बस असे प्रयोग होत असतानाच पीएमपीकडून अशी अर्धवट सेवा मिळत राहिल्यास सार्वजनिक वाहतूक कितपत सक्षम होईल की खासगी वाहनांची संख्या रोडावेल, असा प्रश्‍न आता निर्माण होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.