पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 24 ऑक्टोबरपासून लोहगाव विमानतळाहून शहराच्या विविध भागांमध्ये सेवा देण्यास सुरुवात झाली. मंगळवारपासून या सेवेच्या तिकीटदरात घट झाली असून, येत्या काळात 20 ते 150 रुपयांचा तिकीट दर आकारण्यात येणार आहे.
ई-बसद्वारे लोहगाव विमानतळाहून “अभि’ ही सेवा सुरू केली होती. त्यांतर्गत हिंजवडी, हडपसर, स्वारगेट, कोथरूड आणि निगडी या मार्गावर बसेस धावत आहेत. दररोज या मार्गांवर बसेसच्या 412 फेऱ्या होत होत्या.
लोहगाव विमानतळाहून सुटणाऱ्या बसेससाठी पहिल्या टप्प्यात 50, 100, 150, 180 या प्रमाणे तिकीट दर आकारण्यात येत होता. मात्र मंगळवारपासून या तिकीटदरात कपात करण्यात आली आहे.
आगामी काळात विमानतळ ते हिंजवडी या मार्गावर 20 ते 150 रुपये, विमानतळ ते भेकराईनगर या मार्गावर 20 ते 110 रुपये, विमानतळ ते स्वारगेट या मार्गावर 20 ते 100 रुपये, विमानतळ ते कोथरूड या मार्गावर 20 ते 100 रुपये, विमानतळ ते निगडी या मार्गावर 20 ते 120 रुपये असा तिकीट दर आकारण्यात येणार आहे.