सध्याच्या काळात सोशल मीडियाशी जोडले गेलेले नसलेल्यांना आऊटडेटेड ठरवले जाते. बॉलीवूडसारख्या मनोरजंनाच्या क्षेत्रातील कलाकारांसाठी तर सोशल मीडियाच्या रूपाने जणू लॉटरीच लागली आहे. त्याचे काही दुष्परिणामही भोगावे लागत असले तरी आपल्या भूमिकांविषयी, जीवनशैलींविषयी, विचारांविषयी चाहत्यांना काय वाटते हे थेटपणाने आणि काही क्षणांत जाणून घेण्याची आणि त्याचबरोबरीने वारेमाप लोकप्रियता मिळवून देण्याची किमया या माध्यमामुळे साधली गेली आहे. सोशल मीडियाचा पसारा मोठा आहे.
त्यामुळे त्यातील सर्वच साईट किंवा ऍपशी जोडले जाणे प्रत्येक कलाकाराला शक्य नसते. पण तरीही काही लोकप्रिय सोशल मीडियांशी ही मंडळी जुळलेली असतात. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसऍप, ट्विटर या बरोबरीने सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या टिकटॉकचा वापरही कलाकार मंडळी करुन घेत आहेत. टिकटॉकची मोहिनी सुप्रसिद्ध पाश्चिमात्य गायक जस्टिन बीबरलाही भुरळ घालून गेली आहे.
अलीकडेच तो या नवमाध्यमाशी जोडला गेला. त्याने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये जुन्या-नव्या फोटोंचा वापर करुन एक व्हिडिओ बनवून तो शेअर केला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये जस्टिनने आपल्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाचे चित्रण बनवले आहे. तसेच “मी हे सुयोग्य प्रकारे करत आहे’ असे कॅप्शनही दिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 153.5 हजार लाईक्स मिळाले आहेत.