पडवीत ढगफुटीने शेतकऱ्यांची दाणादाण

वरवंड -दौंड तालुक्‍याच्या जिरायती भागातील पडवी, माळवाडी, सुपे घाट आणि परिसरात दोन दिवसांपूर्वी ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडला. यामुळे परिसरातील विहिरी, बंधारे भरून वाहू लागले. ओढे तुडुंब भरून वाहू लागले. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना या दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे.

दौंड तालुक्‍याच्या जिरायती भागातील माळवाडी, पडवी परिसराला दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने या भागातील नागरिकांना जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागला. परिसरातील विहिरी, कूपनलिकांतील पाणीपातळी कमी झाल्याने तसेच बंधारे, ओढे, तलाव यांतील पाणी आटल्याने यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागला. पिके जळून गेली आहेत. जनावरांना पाणी चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी मोठी मेहनत शेतकऱ्यांना करावी लागली होती. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते.

अचानकच परिसरात ढगफुटी झाल्यासारखा पावसाचे आगमन झाले. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. परिसरातील शेतीजमीनी पाण्याने पूर्ण भरून गेल्या होत्या. शेतजमिनींना तलावाचे स्वरूप आले होते. चौफुला-सुपे रोडवरून अर्धा तास पाणी वाहत होते. परिसरातील काही रस्तेही पाण्याखाली गेले होते. परिसरातील ओढे, नाले, तुडुंब भरून वाहिले, काही विहिरी पाण्याने पूर्ण भरल्या आहेत.

मोठा पाऊस झाल्याने शेतकरी आश्‍चर्य व्यक्‍त करीत आहेत. अचानक ढगफुटी झाल्यासारखा झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला असून शेतातील पेरणीचे नियोजन करीत असल्याचे चित्र दिसत आहे. पडवी, माळवाडी, सुपे घाट परिसरात ढगफुटी झाल्यासारखा झालेल्या पावसाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.