दौंड – दौंड शहरातील होलसेल किराण्याच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून 19 लाख 20 हजार रुपयांची रक्कम लंपास केली असल्याची घटना सोमवारी (दि. 6) रात्रीच्या सुमारास घडली. या किराणा व्यापाऱ्याचे नाव भक्तु नेवदमल सुखेजा असे असून, त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत दौंड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भक्तु सुखेजा हे मंगळवारी (दि. 6) रात्री सव्वादहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांचे होलसेल किराणा मालाचे दुकान बंद करून घरी जात होते. शहरातील संधी मंगल कार्यालयजवळ ते आले असता त्यांच्या मागून पाचजण आले. त्यांनी सुखेजा यांच्या डोळ्यावर मिरचीपूड फेकली आणि त्यांच्या हातातील 19 लाख 20 हजार रुपये रक्कम असलेली पिशवी हिसकावून घेऊन पळ काढला.
यावेळी सुखेजा यांनी आरडाओरडा केला, नागरिक जमाही झाले होते; पण चोरटे पळून गेले. या चोरट्यांनी स्पोर्टस शूज, हिरवे-काळे जॅकेट परिधान केले होते, अशी माहिती दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक के. बी. पांढरे यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.
शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
मागील काही दिवसांत दौंड शहरातील दाट लोकवस्तीमध्ये दिवसा घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या चोऱ्यांचा तपास अजून तपास लागलेला नाही. त्यातच काल घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.