व्यवसायाच्या वादातून इमारतीवरून एकास फेकले

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल : नऱ्हे येथील घटना

पुणे – फायनान्सचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एकाला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले. यामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून सिंहगड पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या एका 32 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी कमिशन घेऊन कर्ज मिळवून देण्याचा व्यवसाय करतात. या व्यावसायिक वादातून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते. या वादातून फिर्यादीला नऱ्हे येथील स्वामी पुरम सोसायटीमध्ये मंगळवारी दुपारी बोलावून घेण्यात आले. तेथे त्यांना आरोपींनी किती होम लोनच्या फाइली केल्या, अशी विचारणा करण्यात आली. यावर फिर्यादीने एकही होम लोनची फाइल केली नसल्याचे सांगितले. या कारणावरून तु खोटे बोलत आहेस, असे म्हणत आरोपींनी त्यांना इलेक्‍ट्रीक वायरने मारहाण केली. यानंतर त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन तसेच पाकिटामधील 15 हजारांची रोकड, हातातील टायटन कंपनीचे घड्याळ, खिशातील आयफोन मोबाइल आणी गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेण्यात आली. यावेळी त्यांच्या छातीत हातोड्याने मारहाण केली गेली. दरम्यान, त्यांना पुन्हा शिवीगाळ करत काठीने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. सरतेशेवटी त्यांना दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली फेकून देण्यात आले. यामध्ये त्यांच्या मणक्‍याच्या हाडाला जबर मार लागला आहे. फिर्यादी यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.घाडगे करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×