सातारा – ऊस तोडणीसाठी घेतलेली उचल बुडवून पळून जाण्यास विरोध करणाऱ्या पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार करणाऱ्या विष्णू सखाराम लोणके (रा. जोगलादेवी, ता. घनसांगवी, जि. जालना) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
याबाबत माहिती अशी की, विष्णू लोणके हा पत्नीसमवेत ऊसतोडणीसाठी रावडी (ता. लोणंद) येथे 2016 साली आला होता. हे दोघे जगताप वस्ती नावाच्या शिवारात झोपडी करून राहत होते.
ऊसतोड करणाऱ्या टोळीच्या मुकादमाकडून उचल म्हणून घेतलेले पैसे घेऊन गावाला पळून जाण्याची तयारी विष्णू लोणकने दि. 9 सप्टेंबर 2016 रोजी केली होती. मात्र, पत्नीने त्याला विरोध केला होता. त्यातून दोघांची वादावादी झाली होती. त्यावेळी आरोपीने पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत पत्नीने लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र औटे यांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीत समोर आलेले पुरावे व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश यांनी विष्णू लोणके याला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे हवालदार पोळ यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले.