पुणे: अल्पवयीन 13 वर्षीय मुलीला बोलावून मोबाइलमध्ये नंबर सेव्ह करण्यास सांगून तिचा विनयभंग करणाऱ्या 55 वर्षीय सुरक्षारक्षकाला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी हा आदेश दिला आहे.
सुरेश सुरेद्रनाथ पन्नीकर ( रा. माळवाडी, ता. मावळ, मुळ रा. केरळ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 3 सप्टेंबर 2016 रोजी तळेगाव दाभाडे येथील एका सोसायटीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.
घटनेच्या दिवशी पीडित शेजारच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या लहान मुलाला सोडायला गेली होती. तेथून ती घरी परत जात असताना तिला पन्नीकर याने बोलाविले. मोबाइलमध्ये नंबर सेव्ह करण्यास सांगण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. घडलेल्या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी तिला देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावर तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तीवाद करताना ऍड. जावेद खान यांनी पन्नीकर याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती.