विकृत चाळे करणाऱ्या शिक्षकाला तीन वर्षे कारावास

संगमनेर  – शाळेतील अल्पवयीन मुलांशी विकृत चाळे करणाऱ्या शिक्षकाला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षाचा कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी (29 जुलै) ठोठावली. कानिफनाथ शंकर पानसरे असे या विकृत शिक्षकाचे नाव आहे. घटनेपासून तो तुरुंगामध्ये होता. दरम्यान महत्वाच्या ठरलेल्या या खटल्यात न्यायालयाने या शिक्षकाच्या विकृतीचा सामना कराव्या लागणाऱ्या मुलांचीदेखील तक्रार घेत याविरोधात नव्याने दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

संगमनेर तालुक्‍यातील एका शाळेतील मुलाच्या पालकाने 8 मार्च 2017 रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तत्कालिन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी यासंदर्भात तपास करत आरोपी कानिफनाथ शंकर पानसरे (वय 51) याला अटक करत न्यायालयात त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारच्यावतीने सरकारी वकील भानुदास कोल्हे यांनी बाजु मांडली. खटल्यात 9 साक्षीदार तपासण्यात आले.

यात या शिक्षकाच्या विकृतीचा सामना करण्याऱ्या अल्पवयीन मुलांचीदेखील साक्ष घेण्यात आली. सहा मुलांवर या शिक्षकाने विकृत वर्तन केल्याचे समोर आले. या मुलांची साक्ष न्यायाधीश घुमरे यांनी ग्राह्य धरत आरोपी पानसरे याला बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार दोषी ठरविले. महत्वाच्या ठरलेल्या या खटल्यात सरकारच्या बाजूने योग्य साक्ष देण्यासाठी पैरवी अधिकारी शकिल इनामदार यांनीदेखील सरकारपक्षाला मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)