अल्पवयीन मुलीचा हात धरणाऱ्याला 3 वर्षे सक्तमजुरी

पुणे(प्रतिनिधी)  – लैंगिक अत्याचाराच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीचा हात धरणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दडांची शिक्षा विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी सुनावली. समसुद्दीन कमालउद्दीन चौधरी (वय 28) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पीडित 12 वर्षीय मुलीच्या आईने चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलीस उपनिरीक्षक आर.टी.सावंत यांनी या प्रकरणाचा तपास केला.

न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस शिपाई नीलेश दरेकर यांनी मदत केली. 19 ऑक्‍टोबर 2019 रोजी चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित मुलगी भाजी विक्रीच्या टपरीवर बसली होती. त्यावेळी चौधरी याने कुरकुरे मागण्याच्या आणि पैसे देण्याच्या बहाण्याने तिचा हात धरत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता 354 आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पास्को) दोषारोपपत्र दाखल केले. यावर युक्तीवाद करताना सरकारी वकील अॅड. अरूंधती ब्रम्हे यांनी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात केली. त्यानुसार पास्को कलम 8 नुसार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.