पुणे – तीन साक्षीदार फितुर झाले असताना परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे फर्निचरचे काम केल्याचे पैसे मागितल्याने झालेल्या शाब्दिक भांडणातून डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश ए.एन.सिरसिकर यांनी सुनावली.
दुर्गेशनाथ गोपीनाथ गोस्वामी (वय 29, रा. लोहगाव, मूळ. राजस्थान) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. नरसिंगराम बुटाराम गर्ग असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी फिर्याद दिली आहे.
सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील संजय पवार यांनी सात साक्षीदार तपासले. ही घटना 28 ते 29 ऑक्टोबर 2018 रोजी घडली. मयत आणि गोस्वामी दोघेही मित्र असून, मूळचे राजस्थानचे आहेत.
गोस्वामी याचे फर्निचरचे काम गर्ग याने केले होते. त्याचे दोन हजार रुपये तो वारंवर मागत होता. 28 ऑक्टोबर रोजी गर्गने पैशाची मागणी केली. त्यावेळी बुधवार पेठ येथे जाऊन गोस्वामी याने त्याला 1 हजार रुपये दिले. त्यानंतर दारू पिल्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी पहाटे ते दुचाकीवरून लोहगावकडे चालले होते.
त्यावेळी संगमवाडीकरून सादलबाबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी दोघात पुन्हा शाब्दिक भांडण सुरू झाले. त्यावेळी गोस्वामी याने गर्ग यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर लाथ मारल्यानंतर बाजूला असलेल्या ओढ्यात गर्ग पडला. वरून सिमेंटचा ब्लॉक मारून गर्ग याचा खून केला. खिशातील एक हजार रुपये घेऊन तो निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.