लखनौ – इंटरनेटवर व्हायरल करण्यात आलेल्या एका व्हिडीओने गोरखपूर पोलिसांची झोप उडवली आहे. आपण तीन जणांची ओळीने हत्या करणार आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा. हत्या कोणाची आणि का केली हे तुम्हाला हत्या झाल्यावरच समजेल असा पोलिसांना चॅजेंज देणारा हा व्हिडीओ त्यामुळे पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही धमकी देणारा पोलीस दलातीलच एक बडतर्फ कर्मचारी आहे.
दिग्विजय राय असे त्याचे नाव असून त्याला गैरवर्तणुकीसाठी बडतर्फ करण्यात आले आहे. तो ज्या पोलीस वसाहतीत राहतो तेथे त्याने धिंगाणा घालत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे शिविगाळ केली होती. त्याकरता त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला सोडून दिल्यानंतर त्याने पुन्हा वसाहतीत जाउन तोडफोड केली. पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याला सेवेतून बडतर्फ केले.
मात्र या प्रकारानंतर तो अजुनच चेकाळला असून आता त्याने थेट फेसबुकवर धमकीचा व्हिडीओ जारी केला आहे. त्यात तीन जणांच्या हत्येची धमकी देण्यात आली आहे. तसेच काय करायचे ते करा असे पोलिसांना आव्हानही देण्यात आले आहे. या प्रकारानंतर त्याची शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.