मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची काल म्हणजेच, 23 जानेवारी रोजी 97 वी जयंती होती. या निमित्ताने विधान भवनातील सेंट्रल हॉल येथे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. तसेच, या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं, पण ते या कार्यक्रमाला आले नाहीत.
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे तसंच संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, कालच्या या कार्यक्रमामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढच्या राजकारणचे संकेत दिले असून, यामुळे आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
यावेळी भाषणादरम्यान संजय राऊत म्हणाले, ‘महाविकासआघाडी सरकारला तीन चाकी रिक्षा सरकार म्हणून म्हणलं गेलं. आज वंचितचं चौथं चाक जोडलं गेलं, आणखी दोन स्टेपनीही तयार आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे आता दोन स्टेपनी म्हणजे कोणते दोन पक्ष? याबाबत मोठा सस्पेन्स राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
दरम्यान, राज्याच्या राजकीय पटावर आता शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचा नवा पॅटर्न पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची काल अधिकृत युती झाल्याची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्याकडून करण्यात आली आहे. काल दुपारी 1 वाजता यासंबंधित एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती.