हप्ता देण्यास नकार दिल्याने तिघांना मारहाण

नगर -सोलापूर रस्त्यावरील छावणी परिषदेच्या टोलनाक्‍यावर शुक्रवारी रात्री आठ जणांनी दहशत निर्माण करीत हप्त्याची मागणी केली. हप्ता देण्यास नकार देणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मारहाण करत गल्ल्यातील 46 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच रात्री एकाला अटक केली आहे.

संदीप ऊर्फ म्हम्या शरद शिंदे (रा. बुरुडगाव रोड, भागवत चाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी एक चारचाकी व दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहे. आरोपी संदीप शिंदे याच्यासह विक्रम गायकवाड, बाबा आढाव (दोघे रा. वाळुंज पारगाव, ता. नगर), संदीप वाकचौरे (रा. दरेवाडी, ता. नगर), प्रकाश कांबळे (पूर्ण नाव नाही, रा. कोंबडीवाला मळा, ता. नगर) इतर दोन अनोळखी यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोलनाक्‍याचे सुपरवायझर अजय सुगंध शिंदे (रा. कायनेटिक चौक, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. मारहाणीत फिर्यादी शिंदे, हनुमंत प्रकाश देशमुख, सचिन तुकाराम पवार हे तिघे जखमी झाले आहेत. सोलापूर रस्त्यावरील छावणी परिषद नाका येथे संशियीत आरोपी स्कॉर्पिओ वाहनातून व दोन दुचाकीवरून पोहचले. विक्रम गायकवाड व बाबा आढाव यांनी कमरेस लावलेले हत्यार काढून नाका सुपरवायझर सचिन तुकाराम पवार यांना आम्हाला दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल, असे सांगितले.

पवार यांनी तुम्ही आमचे मॅनेजर मधुर बागायत यांच्या बरोबर बोला, असे उत्तर दिले. त्याचा राग आल्याने आरोपींनी सचिन यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला नेवून मारहाण करण्यास सुरुवात केली. टोल नाक्‍यावरील कर्मचारी तेथे पोहचले. तुम्ही वाद घालू नका, जे बोलायचे असेल ते साहेबांशी बोला, असे म्हणताच बाबा आढाव याने त्याच्या कमरेला असलेले कोयत्या सारखे हत्यार काढून सचिन पवार यास आम्हाला जर हप्ता दिला नाही, तर तुला जिवे ठार मारून टाकू, असे म्हणून त्याच्या मानेवर हत्यार मारले. पवार यांनी वार चुकविल्याने तो दंडावर लागला. इतर कर्मचारी धावत आल्याने आरोपींनी कॅश काउंटरकडे धावले. कॅशियर हनुमंत प्रकाश देशमुख यास मारहाण करून गल्ल्यातील 46 हजार 740 रोख रक्कम घेवून आरोपी पसार झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.