येरवड्यातील केंद्रावर तीनवेळा ईव्हीएम बंद

अडीच तास थांबली प्रक्रिया : मतदारांनी अधिकारी, पोलिसांना धरले धारेवर

पुणे – येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेतील एका मतदान केंद्रात तीनवेळा ईव्हीएम बंद पडल्याने तब्बल अडीचतास मतदानाची प्रक्रिया थांबल्याला प्रकार घडला. यावरून मतदारांनी केंद्रावरील अधिकारी व पोलिसांना धारेवर धरले.

या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 305 मध्ये सकाळपासून मतदारांची रांग लागली होती. खूपच संथ गतीने रांग पुढे सरकत होती. त्यातच सकाळी एकदा दहा मिनिटे मशीन बंद पडले. तांत्रिक अडचण झाल्यामुळे ते बंद पडल्याचे अधिकाऱ्यांकडून मतदारांना सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा मशीन सुरू झाले. काही वेळानंतर पुन्हा हेच मशीन पंधरा मिनिटे बंद पडले. यावर मतदारांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर मशीन सुरू झाले. काही मतदारांनी मतदान केल्यानंतर दुपारी दोन-अडीच्या सुमारास मशीन बंद पडले. ते लवकर सुरूच झाले नाही.

मशीन सारखे बंद पडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे खूप वेळा थांबलेली मतदानाची प्रक्रिया लवकर सुरू करावी यासाठी मतदारांनी व मतदार प्रतिनिधींनी केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आग्रह धरला. वातावरण तापल्याने या केंद्रावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी मतदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या प्रकाराच्या वस्तुस्थितीची माहिती पोलिसांनी जाणून घेतली.

अखेर वारंवार बंद पडत असलेले मशीन काढून ठेवण्यात आले व त्या ठिकाणी नवीन ठेवण्यात आले. यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, काही मतदारांनी मतदान न करताच परत निघून जाण्याला प्राधान्य दिले. तर काहींनी व मतदार प्रतिनिधींनी मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जेवढे मतदार रांगेत असतील त्या सर्व मतदारांना मतदान करण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्ट करत पोलीस व इतर अधिकाऱ्यांनी तोडगा काढत प्रकरण शांत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.