सर्वात श्रीमंत सी घराण्याचे कब्रस्तान असल्याची शक्यता
बीजिंग : चीनमध्ये गेल्या काही वर्षापासून पुरातत्त्व खात्याकडून ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. त्याच खोदकामात संशोधकांना महत्त्वाची उपलब्धी मिळाली आहे. खोदकाम सुरू असताना संशोधकांना तब्बल तीन हजार वर्षापूर्वीचे एक कबरस्तान सापडले असून ते त्या काळातील सर्वात श्रीमंत घराणे असलेल्या सी घराण्याशी संबंधित असावे अशी शक्यता व्यक्त होत आहे.
चीनमधील हेनान प्रांतातील अन्याग येथे हे खोदकाम सुरू असताना कबरस्तान सापडले तीन हजार वर्षांपूर्वीच्या शांग राजघराण्याच्या राजवटीमध्ये सर्वात श्रीमंत घराणे म्हणून मानण्यात येणाऱ्या सी घराण्याशी संबंधित हे कब्रस्तान असावे, असे संशोधकांना वाटत आहे. हेनान प्रांताची प्राचीन राजधानी असलेल्या यिंगशु पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर हे कब्रस्तान सापडले आहे.
याठिकाणी काही मोठ्या महालांचे अवशेष एका मंदिराचे अवशेष आणि अठरा मोठ्या घरांचे पायाचे दगडही सापडले आहेत. याशिवाय मोठे रथ उभे करण्याच्या जागाही असाव्यात असे काही मोठे खड्डेही या ठिकाणी आढळले आहेत.
या ठिकाणी एकूण चोवीस कबरी सापडल्या असून काही वस्तू आणि दागिनेही आढळल्या आहेत. त्या प्रत्येक गोष्टीवर सी या राजघराण्याची मुद्रा दिसून येते. तीन हजार वर्षांपूर्वी चीनमधील राजकारणामध्ये सी हे घराणे खूपच शक्तिशाली असल्याचा अनेक खुणा या खोदकामांमध्ये संशोधकांना सापडल्या आहेत.