खेड ग्रामपंचायतीत सार्वजनिक स्वच्छतेचे तीन तेरा

सातारा   – सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खेड ग्रामपंचायतीत सार्वजनिक स्वच्छतेचे वाटोळे झाले आहे. सतरा वॉर्डसाठी केवळ पाच घंटागाड्या व ट्रॅक्‍टर इतकी तोकडी यंत्रणा खेड वासियांच्या नशिबी आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा वचक न राहिल्याने खेड परिसर कचऱ्याची बजबजपुरी बनला आहे.

घंटागाडी पुढे गेली की प्लस्टिकच्या कचरा कुंडीत कचरा न टाकता कचरा कुंडीच्या परिसरात टाकण्याची वृत्ती बोकाळल्याने खेड ग्रामपंचायत कचऱ्याचे आगार बनले आहे. काळेश्‍वरी सोसायटी मार्ग, पिरवाडी परिसर, चाहूर फाटा पिछाडी, ज्ञानदीप विद्यालय परिसर, कर्मवीर कॉलनी, गोकर्ण नगर, विकास नगर परिसरात रस्त्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत.

सकाळी आठ ते अकरा या तीन तासात सतरा वॉर्डात सहा वाहनांच्या प्रत्येकी तीन फेऱ्या होतात. मात्र, परिस्थिती अशी आहे की प्रत्येक फेरीला तितकाच कचरा त्या भागात आढळून येतो ही मुख्य अडचण आहे. कचरा व्यवस्थित डस्टबीनमध्ये न टाकता खाजगी प्लॉट अथवा मोकळ्या जागेवर टाकून देण्याची प्रवृत्ती वाढली आहे. तब्बल तीस हजार लोकसंख्या, आणि दहा वॉर्ड, ग्रामपंचायत सदस्य संख्या 17 अशा परिस्थितीत राजकीय व प्रशासकीय नियंत्रणाअभावी विकासाचा अगदी विचका झाला आहे. गोकर्ण कॉलनीत अख्खा एक प्लॉट कचऱ्यामुळे बाद झाला आहे. तेथून पुढे विकासनगरला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला चरींमध्ये पाणी साठून दलदल तयार झाली आहे. साथीच्या रोगाचे थैमान साताऱ्यात सुरू असतात खेड ग्रामपंचायतीत स्वच्छतेच्या उपाययोजना नाहीत.

प्रतापसिंहनगर कॉर्नर ते कृष्णानगर वसाहत या दरम्यान सातारा – पंढरपूर महामार्गाच्या लगतच कचरा टाकण्यात येत असल्याने खेडची चक्‍क कचरा कोंडी झाली आहे. प्रशासनाच्या क्रियाशीलतेअभावी नागरीक मात्र हतबल झाले आहेत. माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या राजकीय प्रभावात येणाऱ्या या ग्रामपंचायतीत विरोधाला विरोध करणाऱ्या दोन गटांमुळे विकास कामांचे गाडे अडकून पडले आहे.

खेड ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेचा ठेका जागतिक दर्जाच्या बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आला आहे. मात्र त्या दर्जाची स्वच्छता होत नसल्याने बीव्हीजीच्या पुरत्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. घंटागाडी व चालक ग्रामपंचायतीचे आणि करार मात्र बीव्हीजीचा असे स्वच्छतेच्या कामाचे येथे कडबोळे झाले आहे. कमीत कमी खर्चात स्वच्छतेची केवळ बिले काढण्यात येत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केल्याने अंतस्थ : वादाचे मुद्दे चव्हाट्यावर आले आहेत. जर ठेका बीव्हीजीकडे होता मग ठिकठिकाणी असणाऱ्या कचरा कुंडीसाठी दहा लाखाचा खर्च कसा झाला? असा सदस्यांचा दुसरा आक्षेप आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.