टीम इंडियाचे T-20 ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंग करू शकतात तीन संघ

नवी दिल्ली : यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धा 2021 सुरू होत आहे. ही स्पर्धा या वर्षी भारतात होणार होती, परंतु कोरोना विषाणूमुळे ती यूएईमध्ये हलवण्यात आली. यावर्षी टी -20 विश्वचषक स्पर्धेत भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे, मात्र 3 संघ असे आहेत जे टीम इंडियाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंग करू शकतात.

टी – 20 वर्ल्डकप जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंग करू शकणारे तीन संघ म्हणजे वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि बांगलादेश. हे सध्याचे टी – 20 फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक संघ आहेत. 2016 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी – 20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत भारताला पराभूत करून स्पर्धेबाहेर केले. 2016 च्या टी -20 विश्वचषकाचे विजेतेपदही वेस्ट इंडिजने जिंकले होते, हा संघ यावेळी गतविजेता देखील आहे.

1. अलीकडेच बांगलादेश क्रिकेट संघाने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियासोबत खेळलेली 5 टी -20 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली. बांगलादेशचा विजय ऐतिहासिक आहे कारण ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात मजबूत संघांपैकी एक मानला जातो. एवढेच नाही तर बांगलादेशने न्यूझीलंडसारख्या संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळणाऱ्या बांगलादेशने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये हा संघ सध्या मजबूत आहे.

2. इंग्लंड
सध्याचा विश्वविजेता इंग्लंड संघ यंदाच्या विश्वचषकात टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका ठरणार आहे. इंग्लिश संघ टॉप ऑर्डरपासून खालच्या फळीपर्यंत धोकादायक खेळाडूंनी भरलेला आहे. जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, इऑन मॉर्गन आणि जोस बटलर तुफान फॉर्मात आहेत. त्याचबरोबर गोलंदाजांमध्ये त्यांच्याकडे एकापेक्षा एक चॅम्पियन खेळाडू आहेत. टी -20 विश्वचषकात भारतीय संघाला इंग्लंडपासून मोठा धोका आहे.

3. वेस्ट इंडिज
सध्या कोणताही संघ टी -20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम असेल तर तो वेस्ट इंडिजचा संघ आहे. या संघाचे फलंदाज आणि गोलंदाज सर्वच लांब फटके मारण्यास सक्षम आहेत. वेस्ट इंडिज संघ हा जगातील एकमेव संघ आहे जो कोणत्याही सामन्याला कोणत्याही क्षणी वळवू शकतो. वेस्ट इंडिजचा संघ शेवटचा टी – 20 विश्वचषक विजेता आहे आणि एवढेच नव्हे तर या संघांने दोनदा ही ट्रॉफी जिंकली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव संघ आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.