नगरच्या तीन शिक्षक नेत्यांची प्रकृती खालावली

नगर – जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणास सहा दिवस लोटले तरी अजून तोडगा निघाला नाही निघाला नाही. या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो माध्यमिक शिक्षक सहभागी झाले असून प्रकृती खालावल्यामुळे जिल्ह्यातील तीन शिक्षक नेत्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सन 2005 पूर्वी नियुक्त असलेल्या मात्र त्यानंतर अनुदानावर आलेल्या शिक्षकांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी दि. 18 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यात जिल्हाभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले आहेत. उपोषणाचे सहा दिवस उलटुनही कोणताच तोडगा न निघाल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे.

कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या भगिनी व शिक्षण संघर्ष समितीच्या नेत्या संगिता शिंदे यांची प्रकृती मंत्रालयात चर्चा करत असतानाच ढासळली त्या दोन दिवसांपासून शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज रविवारी जिल्ह्यातील शिक्षक नेते महेंद्र हिंगे व भद्रिनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक खालावली त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुनील दाणवे यांची प्रकृतीही नाजूक आहे.

दरम्यान प्रशासनाने उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र जोपर्यंत राज्य सरकार लेखी आश्‍वासन देत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार शिक्षकांनी केला असुन या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर मधील अनेक शिक्षक सोमवारी आंदोलनात सहभागी होत आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याशी झालेली चर्चा कोणताच निर्णय न होता निष्फळ ठरली. सोमवारी विधानभवनात यावर जोरदार चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.