मलठण(प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे कार्यरत असलेल्या तीन शिक्षकांनी विद्यार्थांच्या जनरल रजिस्टरमध्ये प्रवेशाच्या वेळी चुकीची माहिती नोंद करणे, रजिस्टरमध्ये खाडाखोड करणे, कामात निष्कळजीपणा तसेच हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर एकाच दिवशी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही कारवाई केली असून तसे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. संतोष भारत पवार, सुभाष बबन शिंदे तसेच केंद्रप्रमुख नंदा गणपत धावडे या तिघांना निलबित करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे व प्रशासकीय दृष्ट्या शाळेतील जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळेची चुकीची माहिती नमूद केली. रजिस्टरमध्ये खाडाखोड करणे, दुरुस्ती करणे, चुकीच्या नोंदी करणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सभा न घेता खोट्या सभा दाखवून इतिवृत्त नोंदवहीमध्ये खोट्या नोंदी करणे, शेरे पुस्तकातील वरिष्ठांनी दिलेल्या शेऱ्यांची अंमलबजावणी न करणे, पायाभूत चाचणीचे पेपर न तपासता निकाल तयार करणे, खोटा व बोगस निकाल तयार करून तो शासनाच्या पोर्टलवर भरून शासनाची फसवणूक करणे आदी प्रकार करून त्यांनी उपशिक्षकाच्या कामांमध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून कर्तव्यामध्ये निष्कळजीपणा केल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांच्यावर ठेवला आहे.
त्यांचे सहकारी शिक्षक सुभाष बबन शिंदे यांनीही या शाळेत मुख्याध्यापक पदाच्या कार्यालयामध्ये जनरल रजिस्टरमध्ये त्रुटींची कल्पना वरिष्ठ कार्यालयास न देणे, इयत्ता पहिली ते चौथी मधील शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत शासनामार्फत पायाभूत / शैक्षणिक प्रगती बाबत शालेय ठिकाणी घेण्यात येणाऱ्या चाचणीचे पेपर न तपासणे, तपासणी न करता गुण देणे, बोगस निकाल तयार करणे, मुख्याध्यापकांची स्वाक्षरी न घेता निकाल अंतिम करणे, पायाभूत चाचणीचे न तपासलेले पेपर शासनाच्या पोर्टलवर लोड करणे, शासनाची फसवणूक करणे, पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करणे, कर्तव्यामध्ये कसूर करणे, त्यांनी उपशिक्षक पदाच्या जबाबदारीमध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून कर्तव्यांमध्ये अक्षम्य हयगय करून निष्काळजीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
“पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मलठण (ता. दौंड) जिल्हा परिषद शालेतील शिक्षक निलंबनाचा आदेश पंचायत समिती दौंड कार्यालयात प्राप्त झाला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.”
– अजिंक्य येळे, गटविकास अधिकारी दौंड
तसेच या विभागाच्या कदमवस्ती येथील केंद्रप्रमुख नंदा गणपत धावडे यांनीही पदावर कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या शाळेतील जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी चुकीच्या केलेल्या नोंदीची पडताळणी / खात्री न करता शेरा नमूद करणे, केंद्रातील विद्यार्थ्यांचे पायाभूत चाचणी पेपर न तपासता निकाल पोर्टलवर भरले बाबत खात्री न करणे, पुस्तकातील अभिप्रायानुसार कार्यवाहीबाबत खात्री न करता अभिप्राय नमूद करणे, अपुर्ण रेकॉर्ड आढळून आल्यावरही त्यावर कार्यवाही न करणे आदींबाबीमध्ये त्यांनी पर्यवेक्षकीय कामकाजामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून केंद्रप्रमुख पदाच्या कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा करून अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग केल्याच्या ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.