करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामुळे वाचले तिघांचे प्राण

नवी दिल्ली : करोना व्हायरसची लागण झालेल्या तीन भारतीय अमेरिकन नागरिकांच्या प्रकृतीत कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपीमुळे सुधारणा झाली आहे. या तीन भारतीय अमेरिकन नागरिकांना ह्युस्टनमधील रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपीमुळे त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे.

कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये करोना व्हायरसमधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील रक्त करोनाग्रस्त रुग्णांवर वापरण्यात येते. करोना व्हायरसवर लस येण्यासाठी अजून काही महिने जाणार आहेत. त्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे टेक्सास आणि अमेरिकेच्या अन्य शहरातील डॉक्टर जुनी पद्धत वापरुन उपचाराचे नवीन प्रयोग करत आहेत.

कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये करोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लाझ्मा असलेले रक्त करोनाबाधित रुग्णाला चढवले जाते. बरं झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये रोगप्रतिकारक अ‍ॅंटीबॉडीज असतात. व्हायरसविरोधात लढण्यासाठी इम्युन सिस्टिमकडून या अ‍ॅंटीबॉडीज तयार केल्या जातात. रक्तातील हे घटक आजारी रुग्णाच्या इम्युन सिस्टिमला बळ देतात.

अ‍ॅंटीबॉडीज म्हणजे रक्तातील प्रोटीन जे विषाणू विरोधात लढा देतात. लस उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टर, नर्सेस कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपीचा प्राधान्य देत आहेत. कारण या थेरपीमध्ये धोका कमी असून यापूर्वी संसर्गाची साथ असताना ही उपचार पद्धती उपयोगी पडली आहे. ह्युस्टनमधील बायलोर सेंट ल्युक मेडीकल सेंटरमध्ये पाच रुग्णांवर कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले अशी माहिती अशोक बालासुब्रमण्यम यांनी दिली. तीन भारतीय रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.