दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणी दोषींना जन्मठेप आणि दंडही ठोठावला
हैदराबाद : दलित महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या आरोपात दोषी ठरलेल्या तिघांना विशेष न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या घृणास्पद प्रकरणानंतर केवळ दोनच महिन्यात या प्रकरणी निकाल सुनावला गेला आहे. या दोषींना 26 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.
गेल्या वर्षी 25 नोव्हेंबरला तेलंगणच्या कुमराम-भीम आफिसाबाद जिल्ह्यातल्या लिंगापूर मंडळ भागात 30 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. ही महिला उदरनिर्वाहासाठी फुगी विक्रीचा व्यवसाय करत होती. मयत महिलेचा गळा चिरण्यात आला होता.
तसेच तिच्या अंगावर वारांच्या खुणाही होत्या. या प्रकरणी साईक बाबू (वय 35), शैक शबुद्दीन (50) आणि शैक मुकद्दम (वय 45 च्या आसपास) या तिघा मजुरांना 27 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार, हत्या आणि अल्पसंख्यांकांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली.
यातील शबुद्दीन आणि मुकद्दम यांच्याविरोधात मालमत्ता विद्ध्वंसक कायद्याखालीही गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एम प्रियदर्शिनी (विशेष कोर्टाचे प्रभारी) यांनी निकाल दिला आणि या तिघाही आरोपींना दोषी ठरवले, असे अतिरिक्त सरकारी वकिल एम. रामण्णा रेड्डी यांनी सांगितले.
या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली. तसेच तर दुसरा व तिसरा दोषीला पीडीत महिलेच्या मोबाइल आणि 200 रुपयांची चोरी केल्याबद्दल तीन वर्षांची अतिरिक्त शिक्षाही सुनावण्यात आली.
पीडीत महिलेवर बलात्कार आणि जबर मारहाण करून हत्या केली गेल्यामुळे ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या निकालाबद्दल मयत महिलेच्या पतीने समाधान व्यक्त केले. तसेच या तिघांनाही ताबडतोब फाशी देण्यात यावी, अशी मागणीही न्यायालयाकडे केली आहे.