पुणे – सैन्य दलात शिपाई पदाच्या भरतीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणात तिघांची न्यायालयीन कोठडी रद्द करुन त्यांना दि.15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी दिला.
याप्रकरणी, जयदेवसिंग परिहार, वेनसिंग लालसिंग रावत (रा. घोरपडी), रवींद्र राठोड (वडगाव शेरी) यांना दि. 2 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कारण, पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची चेकलिस्ट न्यायालयात सादर केली नव्हती. या आदेशाविरुद्ध तपासी अंमलदार यांच्यातर्फे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी सत्र न्यायालयात फेरविचार अर्ज दाखल केला.
तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करुन आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. ही याचिका अतिरिक्त सत्र न्यायाधीश ग्वालानी यांनी मंजूर केली.