चंदीगड – आरबीआयच्या नोटा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रक एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला असून यामध्ये दोन ट्रकचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
चंदीगड रेल्वे स्टेशनवरून हे ट्रक सेक्टर-17 मध्ये असलेल्या आरबीआय कार्यालयाकडे जात होते. या ट्रकमध्ये पैसे असल्याने या ताफ्याला पुढे आणि मागे तसेच ट्रकमध्येही पोलीस संरक्षण देण्यात आले होते. सेक्टर 26 मध्ये पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीने अचानक ब्रेक लावला. यामुळे मागोमाग असलेल्या पहिल्या ते दुसऱ्या ट्रकनाही ब्रेक लावावे लागले. परंतू, हा प्रकार तिसऱ्या ट्रकला न दिसल्याने तो दुसऱ्या ट्रकला धडकला.
या अपघातात संरक्षणासाठी असलेली महिला पोलीस आतमध्ये अडकली. यात तिचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. ही महिला पोलिस केबिन मध्ये अडकली असून तिला कटरच्या साह्याने ट्रकची केबिन कापून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, बेजबाबदारपणे वाहन चालविणे आणि सुरक्षित अंतर न राखल्याच्या आरोपाखाली ट्रक चालक तेजिंदर सिंग आणि गुरबेज सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.